चंद्रपूर जिल्ह्यातील ३० शाळा बनणार पीएम श्री मॉडेल स्कूल

- गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी होणार विकास; राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०च्या शिफारशींची प्रभावी अंमलबजावणी
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : केंद्र शासनाच्या पीएम श्री योजनेअंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील एकूण ३० शाळांचा गुणवत्तावाढीसाठी विकास करण्यात येणार आहे. या शाळा उत्तम गुणवत्तेच्या दृष्टीने विकसित करून जिल्ह्यातील इतर शाळांसाठी मार्गदर्शक ठरतील, अशा स्वरूपात त्यांची निर्मिती केली जाणार आहे.
पीएम श्री योजनेच्या पहिल्या टप्प्यात चंद्रपूर जिल्ह्यातील १८ शाळांची निवड झाली असून, दुसऱ्या टप्प्यात आणखी १२ शाळांची निवड करण्यात आली आहे. या सर्व शाळांमध्ये नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) २०२० मधील शिफारशींनुसार विविध उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी केली जाणार आहे.
सहा प्रमुख घटकांवर आधारित योजना -
पीएम श्री योजना ही नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या सहा प्रमुख स्तंभांवर आधारित आहे. शाळांचा सर्वांगीण विकास आणि विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे, यासाठी या सहा घटकांवर विशेष भर देण्यात येणार आहे.
यामध्ये पुढील बाबींचा समावेश आहे -
- अभ्यासक्रम, अध्यापनशास्त्रीय पद्धती आणि मूल्यमापन
- प्रवेश आणि पायाभूत सुविधा विकास
- मानव संसाधन आणि शालेय नेतृत्व विकास
- समावेशन आणि लिंग समानता
- व्यवस्थापन, सनियंत्रण आणि प्रशासन
- लाभार्थ्यांचे समाधान
या माध्यमातून विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षण पद्धती, चांगल्या सुविधा आणि सर्वांगीण विकासासाठी पोषक वातावरण उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
वरिष्ठ अधिकारी करणार शाळांची पाहणी -
चंद्रपूर जिल्ह्यातील पीएम श्री शाळांना केंद्रस्तरीय आणि राज्यस्तरीय अधिकाऱ्यांनी यापूर्वी भेटी देऊन योजनेच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला आहे. आता निवड झालेल्या ३० शाळांची नियमित तपासणी आणि मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
यासाठी नागपूर बोर्डाचे विभागीय अध्यक्ष, शिक्षण उपसंचालक, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे डाएट प्राचार्य, शिक्षणाधिकारी प्राथमिक/प्रशासन अधिकारी, शिक्षणाधिकारी माध्यमिक, शिक्षणाधिकारी योजना, जिल्हा परिषद चंद्रपूर तसेच पंचायत समिती स्तरावरील गट विकास अधिकारी आणि गटशिक्षणाधिकारी शाळांना भेटी देणार आहेत.
या भेटींमध्ये शाळांमधील सुविधा, शैक्षणिक गुणवत्ता, योजनेची अंमलबजावणी आणि आवश्यक सुधारणांबाबत तपासणी करून मार्गदर्शन केले जाणार आहे. याबाबतची माहिती उपशिक्षणाधिकारी विशाल देशमुख यांनी दिली आहे.
इतर शाळांसाठी ठरणार प्रेरणादायी -
पीएम श्री योजनेतून विकसित होणाऱ्या या शाळांमध्ये विद्यार्थीकेंद्रित शिक्षण, आधुनिक सुविधा, गुणवत्तापूर्ण अध्यापन आणि प्रभावी शालेय व्यवस्थापनावर भर दिला जाणार आहे. या शाळा भविष्यात जिल्ह्यातील इतर शाळांसाठी आदर्श आणि मार्गदर्शक केंद्र म्हणून काम करतील, असा उद्देश आहे.
News - Chandrapur




Petrol Price




