सीताबर्डीत भरधाव दुचाकीची सायकलला धडक : जखमी सायकलस्वाराचा उपचारादरम्यान मृत्यू

- दुचाकीचालकाविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांचा तपास सुरू
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / नागपूर : सीताबर्डी परिसरातील पत्रकार सहनिवास चौकात भरधाव दुचाकीने दिलेल्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या सायकलस्वाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी सीताबर्डी पोलिसांनी संबंधित दुचाकीचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.
मृत सायकलस्वाराचे नाव जटाशंकर लोकई असे असून ते सीताबर्डीतील वसंतराव नाईक झोपडपट्टी परिसरात वास्तव्यास होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १७ जुलै रोजी रात्री सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास जटाशंकर लोकई हे सायकलवरून आपल्या घरी जात होते. पत्रकार सहनिवास चौकात पोहोचताच दुचाकीचालक प्रदीप कुंडलिक बोपचे याने भरधाव व निष्काळजीपणे वाहन चालवत त्यांच्या सायकलला जोरदार धडक दिली.
या धडकेत जटाशंकर लोकई गंभीर जखमी झाले. अपघातानंतर त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना त्यांची प्रकृती खालावली आणि अखेर त्यांचा मृत्यू झाला.
घटनेनंतर सीताबर्डी पोलिसांनी प्रदीप कुंडलिक बोपचे याच्याविरुद्ध निष्काळजीपणे वाहन चालवून अपघात घडवून मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून अपघाताच्या नेमक्या कारणांचा शोध घेतला जात आहे.
या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून, शहरात भरधाव व निष्काळजी वाहनचालकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
News - Nagpur




Petrol Price




