बल्लारशाह रेल्वे जीआरपी चौकी अधिकारीविना : प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / बल्लारपुर : मध्य रेल्वेवरील अत्यंत महत्त्वाचे आणि विदर्भातील सर्वाधिक वर्दळीच्या रेल्वे स्थानकांपैकी एक असलेल्या बल्लारशाह रेल्वे स्थानकावरील सरकारी रेल्वे पोलिस (जीआरपी) चौकी सध्या अधिकारीविना असल्याने हजारो प्रवाशांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. दररोज हजारो प्रवासी या स्थानकावरून प्रवास करतात, तर सुमारे १०० हून अधिक प्रवासी गाड्यांची ये-जा या स्थानकावर होत असते. मात्र एवढ्या महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर जीआरपीचा कायमस्वरूपी अधिकारी उपलब्ध नसल्याने कायदा व सुव्यवस्था तसेच गुन्हे तपासणीवर परिणाम होत असल्याची चर्चा आहे.
रेल्वे स्थानकावरील प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी रेल्वे सुरक्षा बल (आरपीएफ) आणि महाराष्ट्र रेल्वे पोलिस (जीआरपी) यांच्यावर असते. आरपीएफचे अधिकारी व कर्मचारी स्थानकावर नियमित उपस्थित असतात. मात्र जीआरपीकडून केवळ पोलीस अंमलदार कार्यरत असून अधिकाऱ्यांची नियुक्ती नसल्याने अनेक प्रशासकीय व तपासासंदर्भातील कामांमध्ये अडचणी येत असल्याचे सांगितले जाते.
प्राप्त माहितीनुसार, बल्लारशाह जीआरपी चौकीत अवघे नऊ पोलीस अंमलदार कार्यरत आहेत. त्यापैकी अनेक कर्मचारी अप-डाऊन करत असल्याने प्रत्यक्ष ड्युटीवर उपलब्ध मनुष्यबळ मर्यादित राहते. परिणामी, रेल्वे स्थानकासारख्या संवेदनशील ठिकाणी पुरेशी सुरक्षा व्यवस्था राखणे आव्हानात्मक ठरत आहे.
बल्लारशाह जीआरपी चौकीच्या कार्यक्षेत्रात मोठा रेल्वे मार्ग येतो. या हद्दीत पिंपळखुटी हे स्थानक सुमारे १२० किलोमीटर, चिकणी रोड सुमारे ७० किलोमीटर आणि माकोडी सुमारे ४० किलोमीटर अंतरावर आहे. या विस्तीर्ण हद्दीत रेल्वे अपघात, रेल्वे रुळांवरील मृत्यू, चोरी, मारहाण, संशयास्पद घटना किंवा अन्य गुन्हे घडल्यास जीआरपीच्या कर्मचाऱ्यांनाच घटनास्थळी धाव घ्यावी लागते. त्यामुळे एका घटनेच्या तपासासाठी कर्मचारी गेल्यानंतर चौकीतील उपलब्ध मनुष्यबळ आणखी कमी होते.
रेल्वे स्थानकावरील वाढती प्रवासी संख्या, सततची रेल्वे वाहतूक आणि विस्तीर्ण कार्यक्षेत्र लक्षात घेता बल्लारशाह जीआरपी चौकीत तातडीने अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याबरोबरच अतिरिक्त पोलीस कर्मचारी उपलब्ध करून देण्याची मागणी प्रवासी, सामाजिक संघटना आणि नागरिकांकडून होत आहे. अन्यथा भविष्यात एखादी गंभीर घटना घडल्यास त्याचा फटका थेट प्रवाशांच्या सुरक्षेला बसण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
बल्लारशाह सारख्या महत्त्वाच्या जंक्शनवर सक्षम अधिकारी आणि पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध करून रेल्वे सुरक्षा व्यवस्था अधिक बळकट करण्याची आवश्यकता असल्याचे मत रेल्वे प्रवासी व स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत.
News - Chandrapur




Petrol Price




