महत्वाच्या बातम्या

 शेतात काम करताना तरुण शेतकऱ्याचा अचानक मृत्यू


- सावंगी येथील घटना; प्रकृती बिघडल्याने रुग्णालयात नेले, मात्र उपचारापूर्वीच मृत घोषित

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गोंदिया : शेतात पत्नीसोबत काम करत असताना अचानक प्रकृती बिघडल्याने एका तरुण शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सडक-अर्जुनी तालुक्यातील सावंगी येथे घडली. डुग्गीपार पोलिस ठाण्याच्या हद्दीतील ही घटना रविवारी २६ सायंकाळी सुमारे ४ वाजताच्या सुमारास घडली असून, या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मृत शेतकऱ्याचे नाव अतुल हिरामण कांबळे ३५ वर्षे, रा. सावंगी, ता. सडक-अर्जुनी असे आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सायंकाळी अतुल कांबळे हे आपल्या पत्नीसोबत शेतात शेतीची कामे करीत होते. काम सुरू असतानाच त्यांची अचानक प्रकृती खालावली. त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने कुटुंबीयांनी आणि परिसरातील नागरिकांनी तातडीने त्यांना सडक-अर्जुनी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

मात्र, रुग्णालयात पोहोचल्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केली असता अतुल कांबळे यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे घोषित केले. त्यांच्या अकाली निधनाने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून गावात शोककळा पसरली आहे.

या प्रकरणी गजानन आत्माराम निकोडे ४५ वर्षे, रा. सावंगी यांनी दिलेल्या माहितीवरून डुग्गीपार पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होणार असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.





  Print






News - Gondia




Related Photos