सिंदेवाहीतील यशस्वी महिला स्वयंसहाय्यता समूहाचा उत्कृष्ट समूह पुरस्काराने गौरव

- पत्रावळी गृहउद्योगातून महिलांची आर्थिक उन्नती : उमेद अभियानाकडून कार्याचा सन्मान
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / सिंदेवाही : उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत कार्यरत झेप महिला प्रभागसंघ संस्था, प्रभाग रत्नापूर-शिवणी यांच्या वतीने मिनघरी येथे आयोजित कार्यक्रमात रत्नापूर येथील यशस्वी महिला स्वयंसहाय्यता समूहाला सन २०२६-२७ या आर्थिक वर्षातील उत्कृष्ट समूह पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले. पत्रावळी गृहउद्योगाच्या माध्यमातून महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत हा सन्मान देण्यात आला.
रत्नापूर येथील यशस्वी महिला स्वयंसहाय्यता समूहाने सन २०१३ पासून पत्रावळी गृहउद्योगाची यशस्वी सुरुवात केली. गेल्या अनेक वर्षांपासून समूहातील महिला एकजुटीने व खेळीमेळीच्या वातावरणात उद्योग चालवत असून त्यातून स्वतःच्या उत्पन्नात सातत्याने वाढ केली आहे. या उद्योगामुळे समूहातील महिलांना आर्थिक स्वावलंबन मिळाले असून त्यांच्या कुटुंबाच्या आर्थिक उन्नतीतही महत्त्वपूर्ण योगदान मिळाले आहे. त्यामुळे हा समूह परिसरातील इतर महिला बचत समूहांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
समूहाच्या सातत्यपूर्ण आणि उल्लेखनीय कार्याची दखल यापूर्वीही विविध शासकीय विभाग तसेच सामाजिक संस्थांनी घेतली असून अनेक वेळा त्यांचा सन्मान करण्यात आला आहे. आता उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत कार्यरत झेप महिला प्रभागसंघ संस्था, प्रभाग रत्नापूर-शिवणी यांनीही त्यांच्या यशस्वी वाटचालीचा गौरव केला आहे.
तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष, पंचायत समिती सिंदेवाही यांच्या मार्गदर्शनाखाली १५ जुलै २०२६ रोजी मिनघरी येथे आयोजित कार्यक्रमात जिल्हा अभियान व्यवस्थापक शीतल गोरगंट्टीवार आणि झेप महिला प्रभागसंघाच्या अध्यक्षा प्रियंका बोरकर यांच्या हस्ते, तसेच उपस्थित मान्यवरांच्या उपस्थितीत समूहाला उत्कृष्ट समूह सन्मानपत्र प्रदान करण्यात आले.
यावेळी समूहाच्या अध्यक्षा पंचशिला मेश्राम आणि सचिव सुनीता मेश्राम यांनी पुरस्कार स्वीकारला. सन्मानानंतर समूहातील सदस्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून रत्नापूरसह परिसरातील नागरिक, महिला बचत गट आणि विविध स्तरांतून समूहाचे अभिनंदन करण्यात येत आहे.
पत्रावळी गृहउद्योगाच्या माध्यमातून ग्रामीण महिलांनी स्वावलंबनाचा मार्ग स्वीकारत आर्थिक प्रगती साधली असून, सामूहिक प्रयत्न, सातत्य आणि उद्योगशीलतेच्या बळावर ग्रामीण भागातील महिला सक्षमीकरणाचे हे एक प्रेरणादायी उदाहरण ठरत असल्याची भावना कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली.
News - Chandrapur




Petrol Price




