वाढदिवसाच्या शुभेच्छा पाठवल्याने महिला न्यायाधीशाने वकिलाला पाठवले तुरुंगात


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / भोपाल :
महिला न्यायाधीशाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देणे  मध्य प्रदेशातील एका वकिलाला भलतेच  महागात पडलं आहे. विजय सिंह यादव (37 वर्षे) असं या वकिलाचे नाव आहे. त्याने प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी असलेल्या महिलेला या शुभेच्छा पाठवल्या होत्या. 9 फेब्रुवारीला या वकिलाला अटक करण्यात आली असून तेव्हापासून तो तुरुंगातच आहे. यादवच्या विरोधात माहिती तंत्रज्ञान कायदा आणि भारतीय दंड संहितेच्या कलमांअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
यादव याने महिला न्यायाधीशाला 28 जानेवारीच्या रात्री ईमेलवरून आणि नंतर स्पीड पोस्टाद्वारे वाढदिवसाच्या शुभेच्छा पाठवल्या होत्या. यादवविरोधात दाखल करण्यात आलेल्या तक्रारीत म्हटले  की त्याने न्यायाधीशाचा फोटो फेसबुकवरून त्यांच्या परवानगीशिवाय डाऊनलोड केला होता. तक्रारीत पुढे म्हटले  की यादव याने हाच फोटो वाढदिवसाच्या 'आक्षेपार्ह' संदेशासोबत महिला न्यायाधीशाला पाठवला होता. यादवविरोधात 8 फेब्रुवारीला तक्रार दाखल करण्यात आली होती. यादव याचा भाऊ जय याने म्हटले  की त्याच्या भावाचे  म्हणजेच विजय सिंह यादव याचे लग्न झाले  असून त्याला 4 मुले आहेत. यादव हा स्वत:च आपला खटला चालवत असून त्याने कनिष्ठ न्यायालयामध्ये जामिनासाठी अर्ज दाखल केला होता जो 13 फेब्रुवारीला फेटाळण्यात आला होता. यादवने आता उच्च न्यायालयाच्या इंदूर खंडपीठापुढे जामिनासाठी अर्ज दाखल केला असून त्याची सुनावणी 3 मार्चला होणार आहे.
यादवने जामिनासाठी दाखल केलेल्या अर्जात म्हटले  की त्याने या महिला न्यायाधीशाविरोधात पूर्वी रतलामच्या मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. आपण जो शुभेच्छा संदेश न्यायाधीशाला पाठवला होता तो सामाजिक कार्यकर्त्याच्या भूमिकेतून पाठवला होता असे ही त्याचे  म्हणणे आहे. विजय सिंह यादवने म्हटले की तो 'जय कुल देवी सेवा समिती' नावाच्या संस्थेचा जिल्हाध्यक्ष आहे , आणि त्याने याच नात्याने हा शुभेच्छा संदेश पाठवला होता. आपण हा फोटो फेसबुकवरून डाऊनलोड केला नसून तो गुगलवरून डाऊनलोड केल्याचेही विजय सिंह यादवचे म्हणणे आहे. आपण तयार केलेला शुभेच्छा संदेश हा आपण क्रिएटीव्ह डिझायनर या भूमिकेतून तयार केल्याचाही यादव याने दावा केला आहे.
  Print


News - World | Posted : 2021-03-02


Related Photos