चंद्रपूर जिल्ह्यात ६०२० पाणंद रस्त्यांची कामे पूर्ण : १३६७ कामे प्रगतीपथावर


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : शेतकरी बांधवांना शेतात जाणे-येणे सोपे व्हावे, शेतीमालाची वाहतूक जलद व कमी खर्चात करता यावी आणि कृषी यंत्रसामग्री सहजपणे शेतापर्यंत पोहोचविता यावी, यासाठी पाणंद रस्ते हे शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे दळणवळणाचे मार्ग आहेत. एकप्रकारे या रस्त्यांना ग्रामीण भागातील मुख्य जीवनवाहिनी मानले जाते. शेतकऱ्यांसाठी असलेले या रस्त्यांचे महत्व लक्षात घेता चंद्रपूर जिल्ह्यामध्ये महसूल विभाग आणि जिल्हा परिषद यांच्यातील एकत्रित अभिसरण योजनांमधून आतापर्यंत एकूण ६०२० पाणंद रस्त्यांची कामे पूर्ण झाली असून १३६७ कामे प्रगतीपथावर आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा परिषद यांच्या अधिनस्त कार्यान्वय यंत्रणामार्फत सुरवातीच्या महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेतून ६३५१ पाणंद रस्त्याची कामे सुरू करण्यात आली. त्यापैकी ५२७६ पाणंद रस्ते सध्याच्या स्थितीमध्ये पूर्ण झालेली असून त्याचा वापर शेतकरी बांधव करत आहेत. नियोजन विभागातर्फे राबवल्या जाणाऱ्या मातोश्री पाणंद रस्ता योजनेच्या माध्यमातून ३२३ कामे जिल्ह्यात घेण्यात आली होती.
त्यापैकी २३७ कामे पूर्ण स्थितीमध्ये आहेत. जिल्हा खनिकर्म निधी, जिल्हा विकास योजना आणि मनरेगा या तिन्ही योजनांच्या अभिसरणातून चंद्रपूर जिल्ह्यात पालकमंत्री बळीराजा पाणंद रस्ता योजना राबवली जाते. या नावीन्यपूर्ण उपक्रमाच्या माध्यमातून चंद्रपूर जिल्ह्यात १९५ पाणंद रस्त्याच्या कामांना सुरुवात करण्यात आली होती. त्यापैकी सद्यस्थितीत १३३ रस्ते पूर्ण झाले आहेत. राज्य शासनातर्फे मनरेगा योजनेतील अतिरिक्त कुशल घटकातून चंद्रपूर जिल्ह्यामध्ये ५१२ रस्त्यांची कामे घेण्यात आली होती. त्यापैकी ३७४ कामे पूर्ण झाली आहेत.
१४ डिसेंबर २०२५ रोजी ग्रामीण भागातील अंतर्गत दळणवळणाची साधने बळकट करण्यासाठी आणि शेतमालाचा बाजारपेठेतील पुरवठा सुलभ करून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टिकोनातून महसूल विभागातर्फे महत्त्वकांक्षी मुख्यमंत्री शेतकरी बळीराजा पाणंद रस्ता योजना सुरू करण्यात आली आहे.
या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये विधानसभास्तरीय समिती महत्त्वाची भूमिका बजावत आहे. या समितीचे अध्यक्ष हे संबंधित विधानसभेचे सदस्य आणि सदस्य सचिव उपविभागीय अधिकारी आहेत. सदर समितीमध्ये भूमी अभिलेख, ग्रामविकास, वनविभाग, बांधकाम विभाग अशा सर्व विभागाच्या उपविभागस्तरीय प्रमुखांचे समन्वय घडवून विधानसभा स्तरावर पाणंद रस्त्यांच्या बांधकामांचे नियोजन केले जाते. या योजनेच्या माध्यमातून सध्याच्या स्थितीमध्ये चंद्रपूर जिल्ह्यात २५७ रस्ते करण्याचे आराखडे तयार झाले आहेत.
अशी आहे विधानसभानिहाय पाणंद रस्त्यांची आकडेवारी : राजुरा विधानसभा मतदारसंघात मनरेगा, मातोश्री, पालकमंत्री, अतिरिक्त कुशल आणि मुख्यमंत्री बळीराजा पाणंद रस्ते योजनेंतर्गत आतापर्यंत ६६१ कामे पूर्ण तर २४४ प्रगतीपथावर आहेत. चंद्रपूर विधानसभा मतदारसंघात ११४ कामे पूर्ण ३० कामे प्रगतीपथावर, बल्लारपूर विधानसभा मतदारसंघात १०६२ कामे पूर्ण २८८ कामे प्रगतीपथावर, ब्रम्हपुरी विधानसभा मतदारसंघात १३७३ कामे पूर्ण ३४३ कामे प्रगतीपथावर, चिमूर विधानसभा मतदारसंघात २१८२ कामे पूर्ण ४१२ कामे प्रगतीपथावर आणि वरोरा विधानसभा मतदारसंघात २२८ कामे पूर्ण ४१ कामे प्रगतीपथावर आहेत.
शेतकऱ्यांचे मनोगत : पाणंद रस्त्याच्या सुविधेमुळे कसा लाभ झाला, याबाबत बोलतांना ब्रम्हपुरी तालुक्यातील झिलबोडी येथील शेतकरी राजेश नागतोडे म्हणाले, मातोश्री पाणंद रस्ता योजनेतून आमच्या गावाचा रस्ता बांधण्यात आला आहे. शेतात जाण्यासाठी पहिले खुप अडचण होत होती, धुऱ्याने जावे लागत होते. शासनाने पाणंद रस्ता बांधून दिल्यामुळे आता खते, बियाणे, यंत्रसामुग्री थेट शेतापर्यंत पोहचविता येते.
News - Chandrapur




Petrol Price




