शेतकऱ्यांना कॉटन श्रेडरसाठी अनुदान

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा : कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी केंद्र शासनाच्या कापूस उत्पादक अभियान - कपास क्रांती अंतर्गत कॉटन श्रेडर या कृषि यंत्रासाठी अनुदान उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. यासाठी इच्छुक पात्र शेतकऱ्यांनी महाडीबीटीवर ऑनलाईन अर्ज सादर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
कॉटन श्रेडर या यंत्राच्या वापरामुळे कापूस अवशेषांचे वैज्ञानिक पध्दतीने व्यवस्थापन, गुलाबी बोंडअळीचे नियंत्रण, जमिनीचे आरोग्य सुधारणे, सेंद्रीय कर्बाचे प्रमाण वाढविणे तसेच पीक अवशेष जाळण्यास प्रतिबंध होऊन पर्यावरण संरक्षणास चालना मिळते.
योजनेंतर्गत अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीसाठी ५० टक्के कमाल ७५ हजार प्रति युनिट व सर्वसाधारण प्रवर्गासाठी ४० टक्के अनुदान कमाल ६० हजार प्रति युनिट याप्रमाणे अनुदान देण्यात येणार आहे. यासाठी जिल्ह्याला १२६ कॉटन श्रेडर युनिटचा लक्षांक मंजूर करण्यात आलेला आहे.
कॉटन श्रेडरच्या वापरामुळे कापूस खोडांचे तुकडे करुन जलद विघटन होते. गुलाबी बोंडअळी व इतर कीडींचे जीवनचक्र खंडीत होण्यास मदत होते. जमिनीतील सेंद्रीय कर्ब वाढून मातीचे आरोग्य सुधारते. पीक अवशेष जाळण्याची आवश्यकता कमी होऊन पर्यावरण संरक्षणास हातभार लागतो. पुढील पिकासाठी शेताची जलद व सुलभ तयारी होते.
योजनेच्या अधिक माहितीसाठी संबंधित तालुका कृषि अधिकारी किंवा जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी यांनी कळविले आहे.
News - Wardha




Petrol Price




