बामणीत भीषण अपघात : तरुणाचा जागीच मृत्यू, दोघे गंभीर जखमी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : बल्लारपूर तालुक्यातील बामणी येथे सोमवारी सायंकाळी झालेल्या भीषण रस्ता अपघातात एका १९ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य दोघे गंभीर जखमी झाले. या घटनेनंतर परिसरात तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांनी नुकसानभरपाई आणि रस्त्याचे अपूर्ण काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी करत मृतदेह उचलण्यास विरोध केला.
मिळालेल्या माहितीनुसार, अमितनगर (बामणी) येथील रुपेश संजय भोयर (१९ वर्षे), चंद्रशेखर दयानंद कस्तुरे (१९ वर्षे) आणि विशाल उमेश खामनकर हे तिघे दुचाकीवरून टी-पॉइंट परिसरात चहा पिण्यासाठी गेले होते. चहा पिऊन परत येत असताना त्यांची दुचाकी घसरून (स्लीप होऊन) समोरून समांतर मार्गाने जात असलेल्या एमएच-४०-सीएम-९४२२ क्रमांकाच्या ट्रकच्या मागील चाकाखाली गेली.
या भीषण अपघातात रुपेश भोयर याचा जागीच मृत्यू झाला. तर चंद्रशेखर कस्तुरे आणि विशाल खामनकर हे गंभीर जखमी झाले. दोघांनाही प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय, चंद्रपूर येथे हलविण्यात आले.
घटनेची माहिती मिळताच बल्लारपूर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली व पंचनामा करून पुढील कारवाई सुरू केली. दरम्यान, अपघातानंतर बामणी परिसरात नागरिकांनी मोठी गर्दी केली. मृताच्या कुटुंबीयांना तातडीने आर्थिक मदत (नुकसानभरपाई) जाहीर करावी तसेच संबंधित मार्गाचे रखडलेले काम त्वरित पूर्ण करावे, या मागण्यांसाठी नागरिकांनी मृतदेह उचलण्यास काही काळ विरोध केला.
त्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांनी नागरिकांची समजूत काढण्याचे प्रयत्न केल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली.
या प्रकरणी बल्लारपूर पोलीस पुढील तपास करीत आहेत.
News - Chandrapur




Petrol Price




