संसद भवन मार्चला CPIचा पाठिंबा : एटापल्ली येथे निवेदन सादर, शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / एटापल्ली : भारतीय कम्युनिस्ट पक्षाने (CPI) कॉम्रेड सोनम वांगचुक यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आलेल्या संसद भवन मार्चला पाठिंबा जाहीर करत केंद्र सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. याच पार्श्वभूमीवर गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली येथे CPI कार्यकर्त्यांनी उपविभागीय अधिकारी (SDO) कार्यालयासमोर मागण्यांचे निवेदन सादर केले.
हे निवेदन CPI चे जिल्हा सहसचिव कॉ. सचिन मोतकुरवार यांच्या नेतृत्वाखाली सादर करण्यात आले. यावेळी पक्षाच्या वतीने राष्ट्रपती आणि पंतप्रधानांना पाठविण्यात येणाऱ्या निवेदनातून जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या आंदोलन व उपोषणाकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी करण्यात आली.
CPI ने निवेदनात म्हटले आहे की, जंतर-मंतरवरील आंदोलन हे केवळ एका व्यक्तीपुरते मर्यादित नसून देशातील विद्यार्थी, युवक आणि सामान्य नागरिकांच्या भावना व्यक्त करणारे आंदोलन आहे. देशभरात वारंवार समोर येणाऱ्या पेपर लीकच्या घटनांमुळे शिक्षण व्यवस्थेवरील विश्वास कमी होत असून, लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर परिणाम होत असल्याचे पक्षाने नमूद केले.
केंद्र सरकारवर निष्क्रियतेचा आरोप करत CPI ने शिक्षण क्षेत्रातील वाढती अनियमितता आणि भ्रष्टाचार रोखण्यात संबंधित मंत्रालय अपयशी ठरल्याचा दावा केला आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी पक्षाने केली आहे.
यावेळी CPIचे जिल्हा सहसचिव कॉ. सचिन मोतकुरवार यांनी सांगितले की, देशातील शिक्षण व्यवस्था गंभीर संकटातून जात आहे. वारंवार होणाऱ्या पेपर लीकच्या घटनांमुळे विद्यार्थ्यांच्या मेहनतीवर अन्याय होत असून त्यांच्या भविष्याशी खेळ केला जात आहे. केंद्र सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अन्यथा CPIच्या वतीने व्यापक जनआंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला.
या आंदोलनावेळी कॉ. सूरज जक्कुलवार (जिल्हा सदस्य, CPI), तसेच अन्य CPI कार्यकर्ते आणि तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
News - Gadchiroli




Petrol Price




