मुख्यमंत्री बळीराजा पाणंद रस्ते योजनेच्या कामांना वेग : अहेरी विधानसभा क्षेत्रासाठी २०२६-२०२७ चे नियोजन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / अहेरी : मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजनेअंतर्गत अहेरी विधानसभा क्षेत्रातील २०२६-२०२७ या आर्थिक वर्षातील कामांचे नियोजन करण्यासाठी सोमवारी अहेरी तहसील कार्यालयात आमदार डॉ. धर्मरावबाबा आत्राम यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. शेतकऱ्यांना त्यांच्या शेतापर्यंत बारमाही, सुरक्षित आणि दर्जेदार रस्त्यांची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आयोजित या बैठकीत पाचही तालुक्यांतील प्रस्तावित कामांचे नियोजन, प्राधान्यक्रम आणि गुणवत्तापूर्ण अंमलबजावणीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
बैठकीस उपविभागीय अधिकारी प्रशांत पिसाळ, अहेरी, मुलचेरा, एटापल्ली, भामरागड आणि सिरोंचा या पाचही तालुक्यांचे तहसीलदार, गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी तसेच विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत २०२६-२०२७ या आर्थिक वर्षात कोणत्या गावांमध्ये, कोणत्या क्लस्टरनुसार आणि कोणत्या प्राधान्यक्रमाने पाणंद रस्त्यांची कामे हाती घ्यायची, यावर सखोल चर्चा करण्यात आली. प्रत्येक तालुक्यातील प्रत्यक्ष गरजांचा आढावा घेऊन शेतकऱ्यांना जास्तीत जास्त लाभ मिळेल, अशा पद्धतीने नियोजन करण्याचे निर्देश आमदार डॉ. आत्राम यांनी अधिकाऱ्यांना दिले. नवीन प्रस्ताव तयार करताना स्थानिक गरजा, शेतकऱ्यांची संख्या आणि रस्त्यांची उपयुक्तता यांना प्राधान्य देण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
यावेळी २०२५-२०२६ या आर्थिक वर्षातील कामांचाही आढावा घेण्यात आला. सिरोंचा तालुक्यात मोठ्या प्रमाणावर पाणंद रस्त्यांची कामे मंजूर झाली असून त्यापैकी बहुतांश कामे अंतिम टप्प्यात पोहोचली आहेत. यापूर्वी मंजूर झालेल्या कामांची निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू झाली आहे. अनेक कंत्राटदारांनी सहभाग नोंदविला असला तरी शासनाने निश्चित केलेले निकष पूर्ण करणाऱ्या पात्र कंत्राटदारांचीच निवड करण्यात आल्याने कामांना अपेक्षित गती मिळत असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.
भामरागड, मुलचेरा, एटापल्ली आणि अहेरी तालुक्यात नव्याने प्रस्तावित करण्यात येणाऱ्या पाणंद रस्त्यांची निवड, क्लस्टरनिहाय नियोजन, अतिक्रमणमुक्त मार्ग उपलब्ध करून देणे तसेच प्रत्यक्ष कामातील अडचणी दूर करण्याबाबतही सविस्तर चर्चा झाली. सर्व कामे शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, निश्चित कालमर्यादेत आणि उच्च दर्जाची पूर्ण करण्यावर विशेष भर देण्यात आला.
मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजना ही ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची योजना मानली जाते. या योजनेमुळे शेतापर्यंत बारमाही रस्ता उपलब्ध होत असल्याने कृषी यंत्रसामग्रीची ने-आण सुलभ होते, शेतीमालाची वाहतूक जलद व कमी खर्चात करता येते, उत्पादन खर्चात बचत होते आणि ग्रामीण भागातील दळणवळणाला चालना मिळते. परिणामी शेतकऱ्यांच्या आर्थिक प्रगतीबरोबरच गावांच्या सर्वांगीण विकासालाही गती मिळत असल्याने संबंधित विभागांनी समन्वयाने काम करून मंजूर कामे तातडीने पूर्ण करावीत, असे निर्देश आमदार डॉ. धर्मरावबाबा आत्राम यांनी दिले.
कामांच्या गुणवत्तेशी कोणतीही तडजोड होणार नाही – आ. डॉ. धर्मरावबाबा आत्राम -
मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजना ही शेतकऱ्यांच्या हिताची महत्त्वाकांक्षी योजना आहे. प्रत्येक पात्र गाव आणि प्रत्येक पात्र शेतकऱ्याला या योजनेचा लाभ मिळावा, यासाठी प्रशासनाने परस्पर समन्वयाने काम करणे आवश्यक आहे. कामांच्या गुणवत्तेशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही. शासनाच्या निर्णयानुसार नियोजनबद्ध पद्धतीने आणि निश्चित कालमर्यादेत सर्व कामे पूर्ण करावीत, असे निर्देश आमदार डॉ. धर्मरावबाबा आत्राम यांनी बैठकीत दिले.
News - Gadchiroli




Petrol Price




