सेमाना–वाकडी मार्गावर टस्कर हत्तीचा मुक्तसंचार : सलग दुसऱ्या दिवशी वाहतूक विस्कळीत, नागरिकांमध्ये भीती


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : गडचिरोली तालुक्यात गेल्या दहा दिवसांपासून रानटी हत्तींचा वावर पुन्हा वाढला असून, दोन स्वतंत्र टस्कर हत्तींच्या संचारामुळे ग्रामीण भागात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बुधवारी दुपारच्या सुमारास सेमाना–वाकडी मार्गावर एका टस्कर हत्तीचा मुक्तसंचार पाहायला मिळाल्याने काही काळ वाहतूक पूर्णपणे प्रभावित झाली. हत्ती रस्त्यावर आल्याने दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आणि अनेक वाहनचालकांना बराच वेळ थांबून राहावे लागले.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, टस्कर हत्ती काही वेळ रस्त्यावर वावरत राहिल्याने वाहनचालकांनी सुरक्षित अंतर राखत वाहने थांबविली. त्यामुळे कोणतीही अनुचित घटना घडली नाही. मात्र, या घटनेमुळे शेतकरी, मजूर तसेच या मार्गाने नियमित प्रवास करणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण अधिक गडद झाले आहे.
विशेष म्हणजे, मंगळवारी सायंकाळीही याच परिसरात टस्कर हत्तीचे दर्शन झाले होते. त्या वेळीही काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. सलग दुसऱ्या दिवशी हत्ती रस्त्यावर आल्याने वन विभागासमोर त्याच्या हालचालींवर नियंत्रण ठेवण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे.
दरम्यान, रानटी हत्तींचा मुख्य कळप सध्या आरमोरी तालुक्यातील सिर्सी–देऊळगाव जंगल परिसरात असल्याची माहिती मिळाली आहे. यापूर्वी हा कळप गुरवळा भागात असताना त्यामधून आणखी एक टस्कर भरकटल्याचे समोर आले आहे. त्यामुळे गडचिरोली तालुक्यालगतच्या परिसरात आता दोन स्वतंत्र टस्कर हत्तींचा वावर असल्याचे स्पष्ट झाले असून, त्यांचा संचार सतत बदलत असल्याने नागरिकांनी विशेष सतर्क राहण्याची गरज आहे.
हत्तींच्या वाढत्या वावरामुळे शेतपिकांचे नुकसान होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसेच जंगलालगतच्या गावांतील नागरिकांनी रात्रीच्या वेळी अनावश्यक बाहेर पडणे टाळावे, शेतात किंवा जंगल परिसरात एकट्याने जाऊ नये आणि हत्ती दिसल्यास तत्काळ वन विभागाला माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. वन विभागाकडून हत्तींच्या हालचालींवर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत असून, नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत.
News - Gadchiroli




Petrol Price




