महत्वाच्या बातम्या

 रिमझिम पावसाने फुलल्या शेतकऱ्यांच्या आशा


विदर्भ न्युज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : गेल्या काही दिवसांपासून पावसाने पाठ फिरवल्याने जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या चिंतेत होते. खरीप हंगामासाठी वेळेत पेरणी पूर्ण झाल्यानंतर पावसाने अचानक दडी मारल्यामुळे शेतातील सोयाबीन, कापूस आणि धान पिकांना फटका बसू लागला होता.

सततच्या उघडीपामुळे जमिनीतील ओलावा कमी झाल्याने अनेक ठिकाणी पिके कोमेजू लागली होती. त्यामुळे दुबार पेरणीचे संकट ओढवण्याची भीती शेतकऱ्यांना सतावत होती. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून सुरू झालेल्या रिमझिम पावसामुळे शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा एकदा पल्लवित झाल्या आहेत.

यंदा मान्सूनच्या प्रारंभी झालेल्या समाधानकारक पावसामुळे जिल्ह्यात खरीप पिकांची पेरणी मोठ्या प्रमाणावर पूर्ण झाली होती. त्यानंतर पावसाने अचानक विश्रांती घेतल्याने पिकांच्या वाढीवर विपरीत परिणाम होऊ लागला. विशेषत सोयाबीन, कापूस आणि धान या पिकांमध्ये पाण्याअभावी मरगळ दिसून येत होती. काही भागांत पिके वाळण्याच्या मार्गावर असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते.

अशा परिस्थितीत दोन दिवसांपासून सुरू झालेल्या रिमझिम पावसाने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. या पावसामुळे जमिनीतील ओलावा वाढण्यास मदत झाली असून पिकांना नवसंजीवनी मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. पिकांची वाढ पुन्हा जोमाने होण्यास या पावसाचा फायदा होणार असल्याचे शेतकरी सांगत आहेत.

चिमूर, नागभीड, वरोरा, सिंदेवाही, ब्रह्मपुरी, सावली, बल्लारपूर तालुक्यांसह पळसगाव, नवरगाव आणि परिसरातही रिमझिम पावसाने हजेरी लावली. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी या पावसाचे स्वागत केले असून दुबार पेरणीचे संकट काही प्रमाणात टळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

कृषी तज्ज्ञांच्या मते, सध्याचा पाऊस पिकांसाठी पोषक असला तरी आगामी काळात नियमित आणि समाधानकारक पावसाची आवश्यकता आहे. पुढील काही दिवस मान्सून सक्रिय राहिल्यास खरीप पिकांची वाढ चांगली होऊन उत्पादनातही वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे लागल्या असून पावसाची साथ कायम राहावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.





  Print






News - Chandrapur




Related Photos