आ. डॉ. धर्मराव बाबा आत्राम यांच्या अध्यक्षतेखाली अहेरीत एकात्मिक आरोग्यवर्धिनी समितीची स्थापना


- आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्यासाठी महत्त्वाचे पाऊल
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / अहेरी : राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या निर्देशानुसार आरोग्य सेवा अधिक लोकाभिमुख, गतिमान, दर्जेदार व परिणामकारक करण्याच्या उद्देशाने अहेरी विधानसभा क्षेत्रासाठी एकात्मिक आरोग्यवर्धिनी समिती गठीत करण्यात आली. आमदार धर्मराव बाबा आत्राम यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी (१७ जुलै) रोजी तहसील कार्यालय, अहेरी येथे झालेल्या बैठकीत समितीची अधिकृत स्थापना करण्यात आली. या बैठकीला अहेरी विधानसभा क्षेत्रातील अहेरी, मुलचेरा, एटापल्ली, भामरागड आणि सिरोंचा या पाचही तालुक्यांतील आरोग्य विभाग, कृषी विभाग, एकात्मिक बाल विकास प्रकल्प तसेच विविध शासकीय विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
आरोग्य क्षेत्रातील बदल, विभागांमधील समन्वय आणि नागरिकांना अधिक दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. राज्य शासनाच्या निर्णयानुसार स्थापन करण्यात आलेली ही समिती आरोग्य विभागातील कामकाज अधिक परिणामकारक करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. केंद्र व राज्य शासनाच्या आरोग्य योजनांची प्रभावी अंमलबजावणी, आरोग्य संस्थांचे नियमित मूल्यमापन, सेवेची गुणवत्ता उंचावणे, नागरिकांच्या आरोग्यविषयक तक्रारींचे वेळेत निराकरण करणे, विविध विभागांमध्ये समन्वय निर्माण करणे आणि समुदायाचा सहभाग वाढवणे ही या समितीची प्रमुख उद्दिष्टे आहेत.
समितीच्या माध्यमातून ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे व ग्रामीण रुग्णालयांच्या कामकाजावर नियमित आढावा घेतला जाणार असून, आवश्यक त्या सुधारणा तातडीने सुचवून त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे. त्यामुळे आरोग्य सेवेतील त्रुटी कमी होऊन नागरिकांना अधिक सक्षम, जलद आणि गुणवत्तापूर्ण सेवा मिळण्यास मदत होणार आहे.
शासनाच्या निर्देशानुसार समितीची बैठक दर तीन महिन्यांनी घेण्यात येणार असून, बैठकीत घेतलेल्या निर्णयांच्या अंमलबजावणीचा नियमित आढावा घेतला जाणार आहे. विविध विभागांतील समन्वय वाढवून आरोग्य व्यवस्थेतील अडचणी दूर करण्यासाठी ही समिती प्रभावी व्यासपीठ ठरणार असल्याचे बैठकीत स्पष्ट करण्यात आले.
आरोग्य क्षेत्रातील बदलत्या गरजा, वाढत्या लोकसंख्येचा ताण आणि नागरिकांच्या अपेक्षा लक्षात घेता, अहेरी विधानसभा क्षेत्रात स्थापन झालेली एकात्मिक आरोग्यवर्धिनी समिती ही केवळ औपचारिक समिती नसून आरोग्य व्यवस्थेला अधिक उत्तरदायी, पारदर्शक आणि कार्यक्षम बनविण्याच्या दिशेने उचललेले एक महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात आहे. या समितीच्या माध्यमातून आरोग्य विभागासह इतर संबंधित विभागांमध्ये समन्वय वाढून दुर्गम भागातील नागरिकांनाही दर्जेदार आरोग्य सेवा अधिक प्रभावीपणे उपलब्ध होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
News - Gadchiroli




Petrol Price




