गावकऱ्यांनी उधळला दरोड्याचा कट : आठ आरोपी गावकऱ्यांच्या ताब्यात


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : वरोरा तालुक्यातील बेलगाव शिवारात मंगळवारी मध्यरात्री गावकऱ्यांच्या सतर्कतेमुळे संभाव्य मोठा दरोडा टळला. रामा सूर्यभान आत्राम, विकेश अशोक पवार, योगेश पडवाडी काळे, अर्जुन हिराचंद भोसले, निशेष देशकर फुलमाडी, भोलू कवडुजी फुलमाडी, हिमांशु महादेव ताजने आणि गजानन पत्रुजी सेडामे या आठ आरोपींना ग्रामस्थांनी पाठलाग करून पकडले आणि वरोरा पोलिसांच्या ताब्यात दिले. ६ आरोपी हे यवतमाळ जिल्ह्यातील तर २ जण चंद्रपूर जिह्यातील आहे. आरोपींकडून दरोड्याच्या तयारीसाठी वापरले जाणारे साहित्य, चार दुचाकी आणि पाच मोबाईल जप्त करण्यात आले.
१४ जुलै रोजी मध्यरात्री शेतात जागली करणारे श्रीकांत उराडे यांनी बेलगाव शिवारात सात ते आठ जण संशयास्पदरीत्या फिरत असल्याची माहिती दिली. त्यानंतर बेलगाव व कोढाळा येथील ग्रामस्थांनी एकत्र येऊन शेत परिसरात शोधमोहीम राबविली.
शेत परिसरात आठ जण पळून जाताना दिसताच ग्रामस्थांनी त्यांचा पाठलाग करून सर्वांना पकडले. यावेळी आरोपींनी गावकऱ्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. आरोपी हिमांशु महादेव ताजने याच्याकडील पिशवीत मोटारसायकलच्या शॉक-अब्झॉर्बरचा स्टील रॉड, हातोडी, दोन पेचकस, लोखंडी रॉड, टॉर्च आणि बॅटऱ्या आढळून आल्या.
आरोपींनी बालाजी दरेकर यांच्या शेतात चार दुचाकी लपवून ठेवल्याचे उघड झाले. त्या दुचाकींसह पाच मोबाईल फोन पोलिसांनी जप्त केले आहेत. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, आरोपी दरोडा टाकण्याच्या तयारीने बेलगाव शिवारात आले होते.
घटनेची माहिती मिळताच वरोरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन आरोपींना ताब्यात घेतले. दरोडा टाकण्याच्या तयारीसह विविध कलमांनुसार गुन्हा नोंदविण्यात आला असून, आरोपींचे इतर गुन्ह्यांशी संबंध आहेत का, तसेच ते कोणत्या ठिकाणी दरोडा टाकण्याच्या तयारीत होते, याचा सखोल तपास वरोरा पोलीस करीत आहेत.
News - Chandrapur




Petrol Price




