चाळवासी नागरिकांना वीज मीटर व नळजोडणीची सुविधा : स्थायी पट्ट्यांसाठीही हालचाली


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : प्रभाग क्रमांक ६ मधील दादा नौरोजी वॉर्डातील चाळीत वास्तव्यास असलेल्या नागरिकांना अनेक वर्षांपासून मूलभूत सुविधांपासून वंचित राहावे लागत होते. या नागरिकांना स्वतंत्र वीज मीटर तसेच पिण्याच्या पाण्याच्या नळजोडण्या उपलब्ध करून देण्यात आल्याने परिसरातील रहिवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.
भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा वन विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष चंदनसिंह चंदेल यांच्या पुढाकारातून आणि माजी नगरसेविका जयश्री किशोर मोहुर्ले यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीमार्फत स्वतंत्र विद्युत मीटर आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत पिण्याच्या पाण्याचे नळ कनेक्शन नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आले.
याशिवाय, चाळीत राहणाऱ्या नागरिकांना स्थायी पट्टे मिळावेत, यासाठी नगर परिषद मुख्याधिकारी विशाल वाघ यांच्यासोबत बैठक घेण्यात आली. या बैठकीत संबंधित विषयावर सकारात्मक चर्चा झाली असून, मुख्याधिकाऱ्यांनी याबाबत सकारात्मक भूमिका दर्शविल्याची माहिती देण्यात आली.
यावेळी स्थानिक नागरिकांनी चंदनसिंह चंदेल, जयश्री मोहुर्ले आणि किशोर मोहुर्ले यांनी केलेल्या पाठपुराव्याबद्दल समाधान व्यक्त केले. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मूलभूत सुविधांचा प्रश्न मार्गी लागल्याने रहिवाशांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
या प्रसंगी राहुल येवले, बंडू तावाडे, सावरमल जहांगिड, शालिक यादव, निलेश घुमे, लंकेश कुंजाम, प्रेमीला येरणे, शशिकला दुर्गे, शोभा बुरडकर, मनोज कुंभारे, वंदना कुमरे, वंदना पुणेकर, मालता कोत्तवार, पोचय्या बागय्या, वंदना आस्वले, सुमन ठाकरे, नरेंद्र उराडे, लता घोनमाडे, नरेश चंद्रवंशी, चंद्रमोगली मामीडपल्ली, कन्नकय्या टेलर, गिरजा चंद्रवंशी, हिरव यादव यांच्यासह अनेक लाभार्थी उपस्थित होते.
News - Chandrapur




Petrol Price




