दोन भीषण अपघातांत दोघांचा मृत्यू : मुलीच्या लग्नापूर्वीच वडिलांचे छत्र हरपले

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : कोरपना आणि गडचांदूर पोलीस ठाण्यांच्या हद्दीत झालेल्या दोन वेगवेगळ्या रस्ते अपघातांमध्ये दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. यातील एका घटनेत अवघ्या काही दिवसांवर आलेल्या मुलीच्या लग्नाआधीच वडिलांचा मृत्यू झाल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या दोन्ही घटना अनुक्रमे ११ आणि १२ जून रोजी रात्री सुमारे ११ वाजताच्या सुमारास घडल्या.
रस्त्याच्या कडेला उभ्या खराब ट्रकवर बल्करची धडक; चालक ठार -
यवतमाळ जिल्ह्यातील फुलसावंगी येथील विकास दत्ताराम आडे (वय २९) हे १२ जून रोजी सायंकाळी कोरपना तालुक्यातील अल्ट्राटेक सिमेंट कंपनीतून केटीसी कंपनीच्या बल्कर ट्रक (एमएच-३४ सीक्यू-२३५३) मध्ये सिमेंट भरून परत जात होते. रात्री ११ वाजताच्या सुमारास कोरपना पेट्रोल पंपाजवळ रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या खराब ट्रक (एमएच-१२ बीई-९५१९) ला त्यांच्या ट्रकने मागून जोरदार धडक दिली.
धडक इतकी भीषण होती की विकास आडे हे ट्रकच्या केबिनमध्ये अडकून पडले. त्यांच्या मागून येत असलेल्या ट्रक चालक निलेश जाधव यांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन आडे यांना बाहेर काढून ग्रामीण रुग्णालय, कोरपना येथे दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले.
या प्रकरणी पोलिसांनी खराब ट्रकचे चालक नांदेड जिल्ह्यातील जलदरा येथील प्रवेश नागोराव गोंडले यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.
लग्नाच्या पत्रिका वाटताना अपघात; मुलीच्या डोक्यावरून वडिलांचे छत्र हरपले -
दुसरी घटना ११ जून रोजी रात्री गडचांदूरजवळील खिर्डी मोड परिसरात घडली. कोरपना तालुक्यातील सोनुर्ली येथील मंगल भाऊराव कांबळे (वय ४५) यांच्या मुलीचा विवाह २१ जून रोजी होणार असल्याने ते आपल्या दुचाकीने (एमएच-३४ सीजे-९२१२) लग्नाच्या निमंत्रण पत्रिका वाटण्यासाठी गेले होते.
रात्री सुमारे ११ वाजता गडचांदूरपासून सहा किलोमीटर अंतरावरील खिर्डी मोड येथे त्यांच्या दुचाकीचा अपघात झाला. गावातील भीमराव कांबळे यांनी घटनेची माहिती त्यांचे मोठे भाऊ मानिक कांबळे यांना दिली. नातेवाईकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन मंगल कांबळे यांना ग्रामीण रुग्णालय, गडचांदूर येथे दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले.
या घटनेमुळे ज्या घरात काही दिवसांत लग्नाची शहनाई वाजणार होती, त्या घरावर शोककळा पसरली आहे. मुलीच्या लग्नाच्या तयारीत असलेल्या कुटुंबावर अचानक दुःखाचा डोंगर कोसळल्याने संपूर्ण गाव हळहळ व्यक्त करीत आहे.
मृतकाच्या मोठ्या भावाच्या तक्रारीवरून गडचांदूर पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. दोन्ही अपघातांमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून रस्ते सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
News - Chandrapur




Petrol Price




