मार्कडा कंसोबा व अनखोडा येथे तंबाखूविरोधी धडक मोहीम : दीड लाखांचा मुद्देमाल जप्त, ८ दुकानदारांवर कारवाई

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / चामोर्शी : प्रतिनिधी स्थानिक पोलिस स्टेशनअंतर्गत येणाऱ्या चामोर्शी तालुक्यातील मार्कडा कंसोबा आणि अनखोडा येथे शुक्रवारी पोलिस विभाग, आरोग्य विभाग व मुक्तीपथ यांच्या संयुक्त विद्यमाने तंबाखूविरोधी धडक मोहीम राबविण्यात आली.
या मोहिमेदरम्यान करण्यात आलेल्या अचानक तपासणीत सुमारे दीड लाख रुपये किमतीचा प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांचा साठा जप्त करण्यात आला. तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आठ दुकानदारांवर कोटपा (COTPA) कायद्यांतर्गत दंडात्मक कारवाई करण्यात आली.
ही कारवाई पोलिस उपनिरीक्षक मस्के यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. पथकाने मार्कडा कंसोबा व अनखोडा येथील किराणा दुकाने आणि पानठेल्यांची अचानक तपासणी केली. तपासणीदरम्यान आठ ठिकाणी प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांची साठवण व विक्री होत असल्याचे आढळून आले.
कारवाईत तंबाखू, सुगंधित तंबाखू, सिगारेट तसेच इतर हानिकारक तंबाखूजन्य पदार्थांचा मोठा साठा जप्त करण्यात आला. जप्त करण्यात आलेल्या साहित्याची अंदाजे किंमत दीड लाख रुपये असल्याचे संबंधित विभागाकडून सांगण्यात आले.
नियमबाह्य तंबाखू विक्री करणाऱ्या आठही विक्रेत्यांकडून प्रत्येकी २०० रुपये या प्रमाणे एकूण १,६०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. संबंधित सर्व दुकानदारांविरुद्ध सिगारेट व इतर तंबाखूजन्य उत्पादने जाहिरात प्रतिबंध व व्यापार, वाणिज्य, उत्पादन, पुरवठा व वितरण नियमन अधिनियम कोटपा अंतर्गत कारवाई करण्यात आली.
तंबाखूजन्य पदार्थांच्या बेकायदेशीर विक्रीला आळा घालणे, नागरिकांच्या आरोग्याचे संरक्षण करणे आणि तंबाखूमुक्त समाजाची संकल्पना बळकट करणे हा या मोहिमेचा उद्देश असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
अशा प्रकारच्या संयुक्त कारवाया भविष्यातही नियमितपणे सुरू राहणार असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही प्रशासनाने दिला आहे.
News - Gadchiroli




Petrol Price




