नागपुरात अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई : ५८.४२ लाखांचा संशयित व प्रतिबंधित अन्नसाठा जप्त


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / नागपूर : नागरिकांना सुरक्षित व दर्जेदार अन्नपदार्थ उपलब्ध व्हावेत या उद्देशाने अन्न व औषध प्रशासन विभागाने ३ जून रोजी जिल्ह्यात विविध ठिकाणी धडक कारवाई करत रेडी-टू-सर्व्ह फ्रूट ड्रिंक, न्युट्रास्युटीकल आणि प्रतिबंधित अन्नपदार्थांचा एकूण ५८लाख ४२ हजार ३९६ रुपयांचा साठा जप्त केला.
अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या निर्देशानुसार करण्यात आलेल्या या कारवाईत ३६ हजार ३६६ लिटर रेडी-टू-सर्व्ह फ्रूट ड्रिंक, ५३६ स्ट्रिप्स व २२ प्लास्टिक जार न्युट्रास्युटीकल तसेच १६१ किलो प्रतिबंधित अन्नपदार्थ जप्त करण्यात आले. संबंधित अन्नपदार्थांचे नमुने प्रयोगशाळा विश्लेषणासाठी पाठविण्यात आले आहेत.
गुप्तवार्ता विभागाला मिळालेल्या माहितीनुसार सहायक आयुक्त (गुप्तवार्ता) यदुराज दहातोंडे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने हिंगणा एमआयडीसी येथील एफडीसी लिमिटेडच्या वितरक पेढीची तपासणी केली. तपासणीत एनर्झल (Enerzal) या उत्पादनाच्या लेबलवर Energy and Electrolyte Drink असा उल्लेख आढळून आला. अन्न सुरक्षा व मानक प्राधिकरणाने (FSSAI) यापूर्वीच या उत्पादनास मिसब्रॉडेड (Misbranded) असल्याचे उत्पादकास कळविले होते. प्रशासनाने दिली.
त्यानंतर रेडी टू सर्व्ह फ्रूट बेव्हरेज (एनर्झल) ऑरेंज, ब्लिट्झ, अॅपल फ्लेवर तसेच विविध फ्लेवर्ड ड्रिंक प्रिमिक्सचे 10 नमुने विश्लेषणासाठी घेण्यात आले. यावेळी १ लाख ७९ हजार ६२७ बाटल्या व पॅकेट्सचा सुमारे ५५ लाख ६८ हजार रुपयांचा साठा जप्त करण्यात आला.
याशिवाय धंतोली येथील न्यू रूट्स, स्किन लेझर अँड हेअर क्लिनिकमधून न्युट्रास्युटीकल वर्गातील चार नमुने तपासणीसाठी घेण्यात आले. यामध्ये १ लाख ४२ हजार ८९० रुपयांचा साठा जप्त करण्यात आला. तसेच विविध आस्थापनांवरील तपासणीत १६१ किलो प्रतिबंधित अन्नपदार्थांचा १ लाख ३१ हजार ७२७ रुपयांचा साठाही जप्त करण्यात आला.
ही कारवाई सह आयुक्त कृष्णा जयपूरकर व यदुराज दहातोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी ललित सोयाम, रावसाहेब वाकडे, महेश चहांदे, रा. ब. यादव आणि कि. शि. सोनेवाने यांनी केली. विश्लेषण अहवाल प्राप्त झाल्यानंतर अन्न सुरक्षा व मानके अधिनियम २००६अंतर्गत संबंधितांवर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. सदर मोहीम नियमित सुरु राहणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.अन्नपदार्थांच्या गुणवत्तेबाबत शंका असल्यास नागरिकांनी अन्न व औषध प्रशासनाच्या नागपूर कार्यालयाशी किंवा टोल-फ्री क्रमांक १८०० २२२ ३५६ वर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
News - Nagpur




Petrol Price




