फळपीक विमा योजनेच्या सहभागासाठी १४ जुलैपर्यंत मुदतवाढ


- जिल्ह्यात चार फळपिकाचा योजनेत समावेश
- विमा नोंदणी करण्याचे कृषी विभागाचे आवाहन
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा : प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत पुनर्रचित हवामान आधारित फळपिक विमा योजना (मृग बहार २०२६) सन २०२६ -२७ या एका वर्षासाठी मृग बहारामध्ये जिल्ह्यात चार फळपिकांचा समावेश करण्यात आला आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी १४ जुलै पर्यंत नोंदणी करावी, असे आवाहन कृषि विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.
संत्रा, मोसंबी, लिंबू व हळद या चार फळपिकांसाठी जिल्ह्यात ही योजना लागू करण्यात आली आहे. ही योजना अधिसूचित केलेल्या क्षेत्रातील अधिसूचित फळपिकांसाठी असून कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक आहे. खातेदारांच्या व्यतिरिक्त कुळाने अगर भाडेपट्टीने शेती करणारे शेतकरी भाग घेण्यास पात्र राहतील. मात्र भाडेपट्टीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यास नोंदणीकृत भाडेकरार पीक विमा संकेतस्थळावर अपलोड करणे बंधनकारक आहे. योजनेत सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांना डिजिटल पीक सर्वेक्षण अंतर्गत पिकांची नोंद करणे व ॲग्रीस्टॅक फार्मर आयडी बंधनकारक राहील.
एका तालुक्यात ५०० पेक्षा जास्त विमा अर्ज असल्यास त्या ठिकाणी विमा कंपनी रिमोट सेन्सिंग तंत्रज्ञानाने फळबागेची क्षेत्र पडताळणी करेल आणि ५०० पेक्षा कमी विमा अर्ज असल्यास, त्या ठिकाणी विमा कंपनी कृषि विभागाच्या सहकार्याने प्रत्यक्ष फळबाग लागवड क्षेत्र पडताळणी करेल. जिल्ह्यात प्रति शेतकरी सहभागासाठी कमीत कमी उत्पादनक्षम क्षेत्र २० गुंठे (०.२० हेक्टर सलग क्षेत्र) अशी मर्यादा राहील.
तसेच जास्तीत जास्त क्षेत्र मर्यादा ही सर्व फळपीके व दोन्ही हंगाम मिळून प्रति शेतकरी ४ हेक्टर मर्यादेपर्यंत राहील. अधिसूचित फळपिकांपैकी एका फळपीकासाठी एका वर्षात, एकाच क्षेत्रावर, मृग अथवा आंबिया बहारापैकी कोणत्याही एकाच हंगामाकरिता विमा संरक्षणासाठी अर्ज करता येईल.
संत्रा फळपिकासाठी आर्वी तालुक्यातील खरांगणा, आर्वी, रोहणा, वाढोणा, वाठोडा, दौतपूर, आष्टी तालुक्यातील आष्टी, तळेगाव, साहूर, अंतोरा, कारंजा तालुक्यातील कारंजा, ठाणेगाव, कन्नमवारग्राम, सारवाडी व दाभा, सेलू तालुक्यातील झडशी, हिंगणी, वर्धा तालुक्यातील आंजी व देवळी तालुक्यातील देवळी महसूल मंडळ, मोसंबी पिकासाठी आष्टी तालुक्यातील आष्टी, तळेगाव, साहूर, अंतोरा, कारंजा तालुक्यातील कारंजा, ठाणेगाव, कन्नमवारग्राम, सारवाडी, दाभा, आर्वी तालुक्यातील वाढोणा, लिंबु पिकासाठी आर्वी तालुक्यातील वाढोणा व हळद पिकासाठी समुद्रपूर तालुक्यातील समुद्रपूर, नंदोरी या महसूल मंडळाचा समावेश करण्यात आला आहे.
संत्रा पिकासाठी १ लाख रुपये विमा संरक्षित रक्कम असून शेतकऱ्यांना ५ हजार रुपये मोसंबी पिकासाठी १ लाख रुपये विमा संरक्षित असून शेतकऱ्यांना ३ हजार रुपये, लिंबु पिकासाठी ८० हजार रुपये विमा संरक्षण असून शेतकऱ्यांना २ हजार ४०० रुपये, हळद पिकासाठी १ लाख ८० हजार विमा संरक्षण असून शेतकऱ्यांना ९ हजार रुपये विमा हप्ता भरावा लागणार आहे.
जिल्ह्यातील अधिसूचित महसूल मंडळांमध्ये येणाऱ्या संत्रा, मोसंबी, लिंबू व हळद उत्पादक शेतकऱ्यांनी आपल्या जवळच्या आपले सरकार सेवा केंद्र किंवा अधिकृत प्रतिनिधींमार्फत आपला विमा प्रस्ताव ऑनलाइन सादर करावा, असे कृषि विभागाने कळविले आहे.
News - Wardha




Petrol Price




