महत्वाच्या बातम्या

 महावितरण अधिकाऱ्याची लाचखोरी उघड : एसीबीच्या सापळ्यात सहायक अभियंता अडकला


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : प्रधानमंत्री सूर्यघर योजनेअंतर्गत बसविण्यात आलेल्या सौरऊर्जा प्रणालीच्या जोडणीसाठी आवश्यक असलेला रिलीज ऑर्डर काढून देण्याच्या मोबदल्यात लाचेची मागणी करून प्रत्यक्ष ३ हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या सिंदेवाही येथील महावितरणच्या सहायक अभियंत्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी), चंद्रपूरच्या पथकाने बुधवारी रंगेहात पकडले. या कारवाईमुळे महावितरण वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. सहायक अभियंता अमोद संतोष रंदये (वय ३८) असे आरोपीचे नाव आहे.

सिंदेवाही येथील महावितरणच्या उपविभाग कार्यालयात कार्यरत असलेले सहायक अभियंता अमोद संतोष रंदये (वय ३८) यांनी प्रधानमंत्री सूर्यघर योजनेअंतर्गत दोन ग्राहकांच्या घरी बसविण्यात आलेल्या सोलर सिस्टीमना महावितरणच्या मीटरवर जोडणी करण्यासाठी आवश्यक असलेला रिलीज ऑर्डर देण्याकरिता प्रत्येकी २ हजार रुपये, अशी एकूण ४ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.

सोलर सिस्टीम बसविण्याचे काम करणाऱ्या तक्रारदारास संबंधित ग्राहकांचे काम पूर्ण करून देण्यासाठी रिलीज ऑर्डर आवश्यक होता. मात्र, त्यासाठी लाचेची मागणी करण्यात आल्याने तक्रारदाराने लाच देण्यास नकार देत १ जुलै रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, चंद्रपूर कार्यालयात तक्रार दाखल केली.

तक्रारीची पडताळणी केल्यानंतर एसीबीच्या पथकाने नियोजनबद्ध सापळा रचला. कारवाईदरम्यान आरोपी अमोद रंदये यांनी तक्रारदाराकडून तडजोडीनंतर ३ हजार रुपयांची लाच स्वीकारताच एसीबीच्या अधिकाऱ्यांनी त्यांना रंगेहात पकडून ताब्यात घेतले. त्यांच्याविरुद्ध संबंधित कलमान्वये गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास सुरू आहे.

सदर कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नागपूर परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक डॉ. दिगंबर प्रधान व अपर पोलीस अधीक्षक माधुरी बावीस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक अनिल जिट्टावार, पोलीस निरीक्षक प्रशांत केदार तसेच पोलीस हवालदार हिवराज नेवारे, रविकांत इंगळे, पोलीस शिपाई अमोल सिडाम, राकेश जांभुळकर, प्रदीप ताडाम, महेश माहूरपवार, सचिन गजभिये, महिला पोलीस शिपाई मेघा मोहुर्ले, चालक पोलीस शिपाई सतीश सिडाम तसेच मोटार परिवहन विभागाचे चालक पोलीस शिपाई संदीप कौरासे यांनी केले.





  Print






News - Chandrapur




Related Photos