भंडारा : रस्त्यावरील नादुरुस्त ट्रकला दुसऱ्या ट्रकची धडक : चालक गंभीर जखमी

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / भंडारा : महामार्गावर नादुरुस्त झालेला ट्रक सुरक्षिततेची कोणतीही खबरदारी न घेता निष्काळजीपणे उभा ठेवल्यामुळे झालेल्या भीषण अपघातात एक चालक गंभीररित्या जखमी झाला असून ही घटना जवाहरनगर शिवारात २० जून रोजी सकाळी ७:१५ वाजताच्या सुमारास घडली. राजबाबु श्रीभगवानदास रॉय (३२, रा. प्रयागराज, उत्तर प्रदेश) असे या अपघातात गंभीर जखमी झालेल्या ट्रक चालकाचे नाव आहे.
मध्यप्रदेशातील छिंदवाडा येथील चालक अमजद खान (४९) याचा ट्रक (क्रमांक एमएच ४० सीडी ६७८१) रस्त्यात बंद पडला होता, मात्र वाहतूक नियमांचे सर्रास उल्लंघन करत अमजद खान याने रस्त्यावर नादुरुस्त वाहन उभे असताना इतर वाहनांना इशारा देणारी कोणतीही उपाययोजना, बॅरिकेड्स किंवा इंडिकेटर लावले नव्हते.
अशातच मागून येणाऱ्या राजबाबु रॉय यांच्या ट्रकने रस्त्यात उभ्या असलेल्या या ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिली. या भीषण धडकेत राजबाबु हे गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. महामार्गावर सुरक्षिततेचे नियम न पाळता आणि कोणतीही पूर्वकल्पना न देता वाहने उभी करून इतरांच्या जिवाशी खेळणाऱ्या बेजबाबदार चालकांवर कडक कारवाई करण्याची मागणी आता प्रवाशांमधून केली जात आहे.
News - Bhandara




Petrol Price




