रंगलेल्या पावलांनी ज्ञानमंदिरात प्रवेश : चिमुकल्यांच्या स्वागताने फुलली मद्दिगुडम शाळा


- कृषी विस्तार अधिकारी गणेश मानकर यांच्या हस्ते नवागत विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / अहेरी : नवीन शैक्षणिक सत्र २०२६-२०२७ च्या प्रारंभी मंगळवारी (३० जून) गडचिरोली जिल्ह्यातील शाळांमध्ये प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. त्याच अनुषंगाने पंचायत समिती अहेरी अंतर्गत वेलगुर केंद्रातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, मद्दिगुडम येथे प्रवेशोत्सव आनंददायी, उत्साहपूर्ण आणि संस्मरणीय वातावरणात पार पडला.
शाळेत प्रथमच प्रवेश घेतलेल्या चिमुकल्यांचे पारंपरिक पद्धतीने औक्षण करून त्यांच्यावर फुलांची उधळण करण्यात आली. त्यानंतर विद्यार्थ्यांच्या पायांना रंग लावून कॅनव्हासवर त्यांच्या रंगीत पाऊलखुणा उमटविण्यात आल्या. नव्या शैक्षणिक प्रवासाची ही पहिली पावले कायमस्वरूपी जतन करण्याच्या या अभिनव उपक्रमामुळे शाळेचा परिसर चिमुकल्यांच्या निरागस हास्याने, आनंदाने आणि उत्साहाने बहरून गेला.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे कृषी विस्तार अधिकारी गणेश मानकर यांच्या हस्ते नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना नियमित शाळेत उपस्थित राहून मनापासून शिक्षण घेण्याचे आवाहन केले. तसेच पालकांनी मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षण प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेऊन मुलांना नियमित शाळेत पाठवावे, असे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी शाळेतील शिक्षकांनी सांगितले की, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासाची सुरुवात या प्रतिकात्मक पाऊलखुणांपासून होत असून भविष्यात या पाऊलखुणा विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांसाठीही प्रेरणादायी आणि भावनिक आठवण ठरतील. शिक्षणासोबत भावनिक नाते दृढ करण्याच्या उद्देशाने राबविण्यात आलेला हा अभिनव उपक्रम उपस्थितांच्या मनावर कायमची छाप उमटवून गेला.
कार्यक्रमाला शाळेचे मुख्याध्यापक वेलादी, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा कविता संतोष पोटे, उपाध्यक्षा सुनीता गणेश गुंडावार, सदस्य शैलेश मच्छावार, साईनाथ पोटे, तसेच इतर समिती सदस्य, पालक, ग्रामस्थ आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रंगलेल्या पावलांनी ज्ञानमंदिरात झालेला हा प्रवेश केवळ स्वागताचा सोहळा न राहता, चिमुकल्यांच्या शैक्षणिक जीवनातील पहिल्या पावलांची अविस्मरणीय नोंद ठरला. विद्यार्थ्यांमध्ये शाळेविषयी आत्मीयता, आपुलकी आणि शिक्षणाची गोडी निर्माण करणाऱ्या या आगळ्यावेगळ्या उपक्रमामुळे नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात प्रेरणादायी, आनंददायी आणि संस्मरणीय वातावरणात झाली.
News - Gadchiroli




Petrol Price




