महत्वाच्या बातम्या

 गडचिरोली : स्मार्ट मीटरचा स्मार्ट धक्का; ग्राहकाच्या हातात ४ लाख ७९ हजाराचे बिल


- कुरूडमधील प्रकाराने महावितरणच्या कारभारावर उठले प्रश्नचिन्ह

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : महावितरणच्या स्मार्ट मीटर योजनेचा सामान्य ग्राहकांना आता स्मार्ट धक्का बसू लागला आहे. देसाईगंज तालुक्यातील कुरूड येथील एका घरगुती वीज ग्राहकाला जून २०२६ महिन्याचे चक्क ४ लाख ७९ हजार ६० रुपये इतके अवाढव्य वीज बिल आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. एरवी दरमहा एक ते अडीच हजार रुपयांच्या आसपास वीज बिल भरणाऱ्या ग्राहकाला अचानक मिळालेल्या या लाखोंच्या बिलामुळे महावितरणच्या बिलिंग प्रणालीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

कुरूड येथील रामदास हरीजी ठाकरे यांच्या बिलाचा इतिहास पाहता, मे २०२६ मध्ये त्यांनी २१४ युनिट वीज वापरली होती, ज्याचे बिल सुमारे २,५०० रुपये आले होते. त्यापूर्वी मार्च महिन्यात ६३ युनिट, तर एप्रिल महिन्यात १०२ युनिट वीज वापराची नोंद होती. मात्र, जून महिन्याच्या बिलात तब्बल २१ हजार ५१ युनिट वीज वापर झाल्याचे दाखवून ४ लाख ७९ हजार ०६० रुपयांचे देयक देण्यात आले आहे. एका घरगुती ग्राहकाने एका महिन्यात इतक्या मोठ्या प्रमाणात वीज वापरणे तांत्रिकदृष्ट्या अशक्यप्राय असल्याने, प्रत्यक्ष पाहणी किंवा मीटर रीडिंग न घेताच हे बिल आकारल्याचा आरोप होत आहे.

सध्या राज्यभरात महावितरणकडून ग्राहकांना जुने मीटर बदलून स्मार्ट मीटर बसविण्यासाठी प्रोत्साहित केले जात आहे. मात्र, अशा घटनांमुळे या योजनेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. जुने मीटर व्यवस्थित सुरू असतानाही नवीन मीटरचा आग्रह कशासाठी, असा सवाल उपस्थित करत नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. स्मार्ट मीटरमुळे अवास्तव बिले येत असल्याच्या तक्रारी विविध भागांतून समोर येत असताना, कुरूडमधील या प्रकाराने या वादाला अधिक खतपाणी घातले आहे. महावितरणने तातडीने या तांत्रिक त्रुटी दूर करून ग्राहकांना दिलासा द्यावा, अन्यथा स्मार्ट मीटरच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा विविध संघटनांनी दिला आहे.

बिलातील धक्कादायक आकडेवारी -
वीज ग्राहक: रामदास हरीजी ठाकरे, कुरूड (ता. देसाईगंज)
मे २०२६ चा वापर: २१४ युनिट (बिल: २,५०० रुपये)
जून २०२६ मध्ये दाखविलेला वापर: २१,०५१ युनिट
जून २०२६ चे एकूण बिल: ४,७९,०६० रुपये





  Print






News - Gadchiroli




Related Photos