महत्वाच्या बातम्या

 जीवन-मरणाच्या संघर्षात चंद्रपूर पोलिसांनी जिंकली शर्यत : १० मिनिटांत तरुणाचा शोध


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : चंद्रपूर जिल्हा पोलिसांच्या सतर्कता, तांत्रिक कौशल्य आणि तातडीच्या समन्वयामुळे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या एका ३२ वर्षीय तरुणाचा जीव वाचवण्यात यश आले आहे. सावली पोलीस, भद्रावती पोलीस आणि सायबर पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त कारवाईत अवघ्या दहा मिनिटांत तरुणाचा शोध घेऊन त्याला सुरक्षित ताब्यात घेण्यात आले.

पोलीस स्टेशन सावली येथे २८ जून रोजी एका ३२ वर्षीय तरुणाच्या बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर संबंधित तरुणाने सकाळी सुमारे ११ वाजताच्या दरम्यान आपल्या नातेवाईकांना व्हिडिओ कॉल करून हातात विषारी रासायनिक द्रव्याची बाटली दाखवत आत्महत्या करणार असल्याचे सांगितले. कॉल अचानक बंद झाल्यानंतर नातेवाईकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आणि त्यांनी तातडीने पोलिसांशी संपर्क साधला.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेत सावली पोलिसांनी त्वरित चंद्रपूर सायबर पोलीस स्टेशनची मदत घेतली. सायबर पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाद्वारे संबंधित तरुणाचे अचूक लोकेशन शोधून काढले. तो भद्रावती पोलीस स्टेशनच्या हद्दीत असल्याचे समोर येताच ही माहिती तत्काळ भद्रावती पोलिसांना देण्यात आली.

माहिती मिळाल्यानंतर भद्रावती पोलिसांनी विलंब न लावता शोधमोहीम सुरू केली. अवघ्या दहा मिनिटांच्या आत पोलिसांनी संबंधित तरुणाचा शोध घेत त्याला सुरक्षित ताब्यात घेतले. त्यानंतर त्याचे समुपदेशन करण्यात आले. पोलिसांच्या संवेदनशील आणि समजूतदार हस्तक्षेपामुळे त्याचे मनपरिवर्तन झाले. पुढील काळजी घेण्यासाठी त्याला त्याच्या नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले.

या घटनेमुळे संभाव्य अनर्थ टळला असून, आपल्या मुलाचा जीव वाचल्याने नातेवाईकांनी चंद्रपूर पोलिसांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. तातडीचा प्रतिसाद, सायबर तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आणि विविध पोलीस यंत्रणांमधील समन्वय यामुळे ही कारवाई विशेष ठरली आहे.

ही कौतुकास्पद आणि जीव वाचविणारी कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सत्यजित आमले यांच्या मार्गदर्शनाखाली मार्गदर्शनाखाली सावली चे पोलीस निरीक्षक प्रदीप पुल्लरवार यांचे नेतृत्वात सहायक पोलीस निरीक्षक सचीन मुसळे, पोहवा संजय शुक्ला, पोअं धिरज पिदुरकर, धनंजय काळे पोस्टे सावली आणि भद्रावती चे सहायक पोलीस निरीक्षक विरेंद्र केदारे, संजय मिश्रा, संतोष केदार, पोहवा गोपाल आतकुलवार, पोअं योगेश घाटोळे, भारत पुसांडे, खुशाल, किरण मिस्त्री पो.स्टे. भद्रावती आणि सायबर पोलीस स्टेशन चे सहायक पोलीस निरीक्षक बलराम झाडोकर, पोअं वैभव पत्तीवार यांनी केली आहे.

वेळीच मिळालेली माहिती, तांत्रिक विश्लेषण आणि पोलिसांची तत्पर कारवाई यामुळे एका कुटुंबावरील दुःखाचा डोंगर कोसळण्यापासून वाचला, अशी भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.





  Print






News - Chandrapur




Related Photos