समृद्धी महामार्गावर भीषण अपघात : चंद्रपूरच्या एकाच कुटुंबातील पाच जणांचा जागीच मृत्यू


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे परिसरात समृद्धी महामार्गावर रविवारी दुपारी झालेल्या भीषण अपघातात चंद्रपूरच्या बाबूपेठ येथील एकाच कुटुंबातील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेमुळे चंद्रपूर शहरासह संपूर्ण जिल्ह्यात शोककळा पसरली आहे.
प्राप्त माहितीनुसार, बाबूपेठ येथील जीवने कुटुंबीय कार क्रमांक एमएच-३४ बीएफ-१३४६ ने चंद्रपूरहून अकोल्याकडे जात होते. दुपारी सुमारे १२ वाजताच्या सुमारास अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे परिसरातील समृद्धी महामार्गावरील चेनज क्रमांक १०५ जवळ त्यांची कार रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कंटेनर ट्रक क्रमांक एनएल-०१ एके-७१२३ वर मागून आदळली. संबंधित ट्रक बिघाडामुळे महामार्गाच्या कडेला उभा असल्याचे सांगितले जात आहे.
धडक इतकी भीषण होती की कारचा पुढील भाग पूर्णपणे चकनाचूर झाला. अपघाताच्या तीव्रतेमुळे कारमधील सर्व प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच दत्तापूर पोलीस, महामार्ग सुरक्षा पथक आणि वाहतूक पोलीस घटनास्थळी दाखल झाले. कारमध्ये अडकलेल्या मृतदेहांना बाहेर काढून पंचनामा करण्यात आला.
या भीषण अपघातात महादेव जिवाजी जीवने (वय ६५), लताबाई महादेव जीवने (६०), भास्कर महादेव जीवने (४३), आरती भास्कर जीवने (वय ४१) आणि त्रिशा भास्कर जीवने (१२), सर्व रा. बाबूपेठ, चंद्रपूर यांचा मृत्यू झाला.
मृतक भास्कर जीवने हे वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेडच्या भटाळी खाणीत वर्कशॉप प्रमुख म्हणून कार्यरत होते. त्यांनी नुकतेच १५ दिवसांपूर्वी या पदाचा कार्यभार स्वीकारला होता. तर त्यांची पत्नी आरती जीवने या महिला व बाल विकास विभागात अधिकारी म्हणून कार्यरत होत्या. त्यांची बदली अकोला जिल्हा परिषदेत झाल्याने त्या नवीन पदाचा कार्यभार स्वीकारण्यासाठी कुटुंबासह अकोल्याकडे जात होत्या. मात्र, अकोल्याकडे जाणारा हा प्रवास जीवने कुटुंबासाठी अखेरचा ठरला.
एकाच कुटुंबातील पाच सदस्यांचा मृत्यू झाल्याने बाबूपेठ परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी आणि परिसरातील नागरिकांनी दुःख व्यक्त केले. चंद्रपूर जिल्ह्यातील विविध सामाजिक, प्रशासकीय आणि औद्योगिक क्षेत्रातील मान्यवरांनीही जीवने कुटुंबीयांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
या प्रकरणी दत्तापूर पोलिसांनी अपघाताची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे. समृद्धी महामार्गावरील या भीषण अपघाताने पुन्हा एकदा रस्ते सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून संपूर्ण परिसरात शोकमय वातावरण निर्माण झाले आहे.
News - Chandrapur




Petrol Price




