कृषी क्षेत्रात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब हेच शेतकऱ्याच्या यशाचे गमक : भास्कर मेश्राम


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : पारंपरिक शेतीपद्धतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देणे काळाची गरज आहे. कृषी क्षेत्रात विविधांगी मार्गांचा अवलंब करून अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे हेच शेतकऱ्याच्या यशाचे मुख्य सूत्र असावे, असे प्रतिपादन जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी भास्कर मेश्राम यांनी केले.
ते ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था (आरसेटी), गडचिरोली येथे आयोजित कृषी उद्यमी प्रशिक्षण कार्यक्रमाच्या समारोपीय सोहळ्यात प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. हा प्रशिक्षण कार्यक्रम ग्रामीण विकास मंत्रालय, भारत सरकार यांच्या अखत्यारीत आणि बँक ऑफ इंडिया द्वारा संचालित आहे.
भास्कर मेश्राम यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले की, पारंपरिक शेतीच्या पलीकडे जाऊन आधुनिक शेतीत नवकल्पना स्वीकारणे आवश्यक आहे. कृषी क्षेत्रात विविध व्यवसाय संधी उपलब्ध असून कुक्कुटपालन, बकरीपालन यांसारख्या पूरक व्यवसायांमुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढू शकते, असेही त्यांनी स्पष्ट केले.
या प्रसंगी आरसेटीचे संचालक नागेश आष्टीकर, कार्यक्रम समन्वयक हेमंत मेश्राम, ग्रामोद्योग कार्यालयाचे सहायक रत्नघोष हुमने, मधू क्षेत्रिक हेमंत आरेराव, आरसेटी श्रेष्ठता केंद्राचे प्रतिनिधी शांतीलाल सेता, प्राचार्य संदीप जाधव, प्रदीप धाकडे तसेच प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमात रत्नघोष हुमने यांनी विभागाच्या विविध अनुदानित योजनांची सविस्तर माहिती दिली, तर हेमंत आरेराव यांनी मधाचे गाव या योजनेबाबत प्रशिक्षणार्थ्यांना मार्गदर्शन केले. शांतीलाल सेता आणि संदीप जाधव यांनी प्रशिक्षणार्थ्यांचे मूल्यमापन केले असून सर्व प्रशिक्षणार्थी यशस्वी ठरले.
सदर निवासी प्रशिक्षण कार्यक्रम १२ जूनपासून सुरू झाला होता. या कालावधीत कुक्कुटपालन व बकरीपालन या विषयांवर विशेष भर देण्यात आला. तसेच कुंभी आणि रामाळा येथे आरसेटीच्या माजी प्रशिक्षणार्थ्यांनी सुरू केलेल्या व्यवसाय स्थळांना भेट देऊन प्रत्यक्ष अनुभव घेण्याची संधीही प्रशिक्षणार्थ्यांना मिळाली.
या प्रशिक्षणादरम्यान डॉक्टर सुचित लाकडे, प्रदीप धाकडे आणि राजेंद्र वंजारे यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच वित्तीय साक्षरतेबाबत उदय काकपूरे यांनी माहिती दिली.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पराग पाटील आणि लुकेश बैरवर यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन हेमंत मेश्राम यांनी केले. या प्रशिक्षणामुळे ग्रामीण युवकांमध्ये कृषी उद्योजकतेबाबत नवे दृष्टीकोन विकसित झाले असून आधुनिक शेती व पूरक व्यवसायांकडे वळण्याची प्रेरणा मिळाली आहे.
News - Gadchiroli




Petrol Price




