महत्वाच्या बातम्या

 नाल्याच्या पाण्यात तोल जाऊन तुमरकोठी येथील नागरिकाचा मृत्यू


- महसूल पथक अन् गावकऱ्यांच्या शोधमोहीमनंतर सापडला मृतदेह

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / भामरागड : तालुक्यातील कोठी ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या तुमरकोठी येथे एक दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे. तुडुंब भरून वाहणाऱ्या नाल्यात तोल गेल्याने कोमटी मासू वडे या इसमाचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, आज सकाळी नाल्यापासून काही अंतरावर त्यांचा मृतदेह आढळून आला.

मिळालेल्या माहितीनुसार, तुमरकोठी येथील रहिवासी कोमटी मासू वडे हे २२ जुलै रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास मरकनार येथून आपल्या स्वगावी तुमरकोठी येथे जाण्यासाठी निघाले होते. वाटेत असलेला नाला तुडुंब भरून वाहत होता. हा नाला पार करत असताना अचानक त्यांचा तोल बिघडला आणि ते नाल्याच्या पाण्यात वाहून गेले.

सायकलवरून लागला सुगावा -
दुसऱ्या दिवशी सकाळी ८ वाजेच्या सुमारास स्थानिक गावकऱ्यांना सदर नाल्याजवळ एक सायकल दिसून आली. संशय आल्याने गावकऱ्यांनी तातडीने महसूल पथकाला याची माहिती दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून महसूल पथक आणि गावकऱ्यांनी मिळून नाल्याच्या परिसरात शोधमोहीम राबवली.

काही वेळ चाललेल्या या शोधाशोधानंतर, नाल्यापासून काही अंतरावर कोमटी वडे यांचा मृतदेह आढळून आला. या घटनेमुळे तुमरकोठी परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलीस व महसूल प्रशासनाकडून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.





  Print






News - Gadchiroli




Related Photos