वेकोलि कंत्राटी कामगाराच्या मृत्यूनंतर संतप्त आंदोलन : ३५ लाख ४३ हजार ४७५ रुपयांची मदत, वारसाला नोकरीचे आश्वासन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड अंतर्गत कार्यरत असलेले कंत्राटी कामगार प्रकाश गजानन मोहरे (वय ४५), रा. रामपूर ता. राजुरा यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्यानंतर संतप्त कुटुंबीय आणि कामगारांनी डब्ल्यूसीएलच्या सब एरिया कार्यालयासमोर मृतदेह ठेवून तीव्र आंदोलन केले. मृतकाच्या कुटुंबाला आर्थिक मदत आणि वारसाला नोकरी देण्याच्या मागणीसाठी करण्यात आलेल्या या आंदोलनानंतर प्रशासनाने ३५ लाख ४३ हजार ४७५ रुपयांची आर्थिक मदत आणि कुटुंबातील एका सदस्याला रोजगार देण्याचे लेखी आश्वासन दिले. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, ७ जून २०२६ रोजी सकाळी सुमारे ११.४० वाजता गोवरी डीप ओपनकास्ट खाण परिसरात पोल शिफ्टिंगचे काम सुरू असताना मेसर्स पी. आर. इलेक्ट्रिकल्स या कंत्राटी कंपनीच्या अधिपत्याखाली कार्यरत असलेले प्रकाश मोहरे हे इलेक्ट्रिक पोलवरून खाली पडले. या अपघातात ते गंभीर जखमी झाले. त्यांना प्रथम क्षेत्रीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना मानवटकर रुग्णालय, चंद्रपूर येथे हलविण्यात आले. मात्र प्रकृतीत अपेक्षित सुधारणा न झाल्याने त्यांना नागपूर येथील केआयएमएस रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
गेल्या १३ दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र २० जून २०२६ रोजी उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. ही बातमी समजताच कुटुंबीय, सहकारी कामगार आणि विविध कामगार संघटनांचे पदाधिकारी आक्रमक झाले. त्यांनी मृतदेह थेट डब्ल्यूसीएलच्या सब एरिया कार्यालयासमोर ठेवून ठिय्या आंदोलन सुरू केले. मृतकाच्या कुटुंबाला तात्काळ आर्थिक मदत, योग्य नुकसानभरपाई आणि वारसाला नोकरी देण्याची मागणी आंदोलकांनी लावून धरली.
आंदोलनामुळे परिसरात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन गोवरी डीप ओसी खाण कार्यालयात उपक्षेत्रीय व्यवस्थापक एम. पार्थसारथी, खान व्यवस्थापक चेपुरी कोमरय्या तसेच खाणीत कार्यरत पाचही कामगार संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेण्यात आली.
बैठकीत कंपनीच्या नियम व तरतुदीनुसार महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. त्यानुसार, स्वर्गीय प्रकाश मोहरे यांच्या कुटुंबाला प्राणघातक अपघात प्रकरणांतर्गत २५ लाख रुपयांची एक्स-ग्रेशिया मदत देण्यात येणार आहे. तसेच कर्मचारी भरपाई अधिनियम, १९२३ अंतर्गत १० लाख ४३ हजार ४७५ रुपये नुकसानभरपाई देण्याचा निर्णय घेण्यात आला. ही संपूर्ण रक्कम १४ दिवसांच्या आत एकरकमी अदा करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.
याशिवाय, स्वर्गीय प्रकाश मोहरे यांच्या कुटुंबातील एका सदस्याला कंत्राटी स्वरूपात रोजगार उपलब्ध करून देण्याचेही लेखी आश्वासन देण्यात आले. प्रशासनाने सर्व मागण्या मान्य केल्यानंतर संतप्त कामगार आणि कुटुंबीयांनी आंदोलन मागे घेतले.
या बैठकीला विविध कामगार संघटनांचे नेते व पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान, या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून खाण क्षेत्रातील कंत्राटी कामगारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. कामगार संघटनांनी भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी सुरक्षा उपाययोजनांची काटेकोर अंमलबजावणी करण्याची मागणी केली आहे.
News - Chandrapur




Petrol Price




