महत्वाच्या बातम्या

 थेरगाव नदीपात्रात अवैध रेती उत्खननावर धडक कारवाई : ४०.२८ लाखांचा मुद्देमाल जप्त


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूरच्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे पोंभूर्णा तालुक्यातील मौजा थेरगाव येथील नदीपात्रात सुरू असलेल्या अवैध रेती उत्खनन व वाहतुकीवर धडक कारवाई केली. या कारवाईत ४० लाख २८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एका आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्राप्त माहितीनुसार, १७ जून २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला थेरगाव नदीपात्रातून गौण खनिज असलेल्या रेतीचे चोरट्या मार्गाने उत्खनन करून वाहतूक केली जात असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पथकाने छापा टाकला असता अवैधरित्या रेती वाहतूक करणारा हायवा ट्रक आढळून आला.

या प्रकरणी ईश्वर सोहनलाल बैरिया (वय ३०), रा. संजयनगर, चंद्रपूर याला आरोपी करण्यात आले आहे. कारवाईदरम्यान पोलीसांनी एमएच-४९ बीझेड-५१५७ क्रमांकाचा अशोक लेलँड हायवा ट्रक आणि सुमारे ४ ब्रास रेती असा एकूण ४० लाख २८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

या प्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध कलम ३०३(२) भारतीय न्याय संहिता (BNS) तसेच जमीन महसूल कायद्याच्या कलम ४८(७) व ४८(८) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास रामनगर पोलीस करीत आहेत.

सदर कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांचा नेतृत्वात पोलीस हवालदार गणेश भोयर, किशोर वैरागडे, अजय बागेसर, पीअं गोपीनाथ नरोटे, शेखर माथनकर यांनी केले. जिल्ह्यात अवैध गौण खनिज उत्खननाविरोधातील कारवाया आगामी काळातही सुरू राहणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.





  Print






News - Chandrapur




Related Photos