रास्त भाव दुकानांतील धान्याच्या गुणवत्तेची तपासणी करा : निकृष्ट धान्य पुरवठादारांवर कारवाईची मागणी

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : सार्वजनिक वितरण प्रणाली (PDS) अंतर्गत रास्त भाव दुकानांमधून वितरित करण्यात येणाऱ्या गहू व तांदळाच्या गुणवत्तेबाबत गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने तक्रारी येत असून, लाभार्थ्यांना निकृष्ट दर्जाचे धान्य मिळत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ता रुपेश वलके यांनी केला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी प्रशासनाकडे केली आहे.
रास्त भाव दुकानांमधून वितरित होणाऱ्या धान्याची तपासणी करताना संबंधित पावतीवर नमूद असलेल्या लॉट क्रमांक, दर्जा व दरानुसार धान्याचे नमुने घेऊन मान्यताप्राप्त प्रयोगशाळेत तपासणी करण्यात यावी, अशी मागणी वलके यांनी केली आहे. सध्या अनेक ठिकाणी धान्याची प्रत्यक्ष तपासणी न करता केवळ कागदोपत्री कार्यवाही केली जात असल्याने लाभार्थ्यांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
अनेक लाभार्थ्यांकडून तुटलेले, रंग बदललेले, दुर्गंधीयुक्त किंवा वापरण्यास अयोग्य धान्य मिळत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. या तक्रारींची निष्पक्ष चौकशी करून वस्तुस्थिती समोर आणावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
तसेच निकृष्ट दर्जाचे धान्य पुरवठा करणारे कंत्राटदार, गोदाम व्यवस्थापन तसेच संबंधित जबाबदार अधिकारी यांच्यावर कठोर प्रशासकीय व कायदेशीर कारवाई करण्यात यावी, असेही वलके यांनी म्हटले आहे.
गरीब व गरजू नागरिकांच्या अन्नसुरक्षेशी संबंधित हा अत्यंत गंभीर विषय असून प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन जिल्हास्तरीय विशेष तपासणी मोहीम राबवावी. अन्यथा नागरिकांच्या हितासाठी लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा सामाजिक कार्यकर्ता रुपेश वलके यांनी दिला आहे.
News - Gadchiroli




Petrol Price




