भरेगाव फाट्याजवळ ट्रक-दुचाकीची भीषण धडक : युवक जागीच ठार

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गोंदिया : देवरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील भरेगाव फाट्याजवळील राष्ट्रीय महामार्गावर मंगळवारी (२० जानेवारी) सायंकाळी सुमारे ७ वाजताच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात एका युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
सुरजकुमार गुहरी यादव (वय २५, रा. बाघनदी, डोंगरगड) असे अपघातात मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. सुरजकुमार यादव हा बाघनदी येथून देवरीकडे आपल्या मोटारसायकलने (क्रमांक सीजी ०८ बी.सी. ७५९८) जात होता. दरम्यान, भरेगाव फाट्याजवळ समोरून भरधाव वेगात येणाऱ्या ट्रकने (क्रमांक सीजी ०८ ए.एस. ७५९८) त्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.
धडकेचा जोर इतका प्रचंड होता की सुरजकुमार यादव याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघातानंतर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात गर्दी झाली. नागरिकांनी तत्काळ देवरी पोलिसांना घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला व मृतदेह ताब्यात घेत उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठविला.
या प्रकरणी फिर्यादी भोलाराम गुहाराम यादव यांच्या तक्रारीवरून देवरी पोलिसांनी संबंधित ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अपघातामुळे काही काळ राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
News - Gondia




Petrol Price




