मोबाईलवर अचानक हीट अलर्ट : सायलेंट मोडमधील फोनही वाजल्याने नागरिकांची धावपळ


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : विदर्भात वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी दुपारी नागरिकांच्या मोबाईलवर अचानक आलेल्या हीट वेव्ह अलर्ट ने एकच खळबळ उडाली. मंत्रालय, मुंबईकडून पाठविण्यात आलेला हा इशारा सायलेंट मोडवर असलेल्या मोबाईलवरही मोठ्या आवाजात वाजल्याने अनेक नागरिक घाबरून गेले. काही काळासाठी कार्यालये, बाजारपेठा, बँका आणि सार्वजनिक ठिकाणी गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
पुढील २४ तासांत अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर आणि वर्धा जिल्ह्यांमध्ये अनेक ठिकाणी तीव्र उष्णतेची लाट येण्याची, तसेच काही भागांत रात्रदेखील उष्ण राहण्याची शक्यता आहे, असा संदेश मोबाईलवर झळकला. अचानक आलेल्या या अलर्टमुळे अनेकांनी प्रथम हा एखाद्या मोठ्या आपत्तीचा इशारा असल्याचा समज करून घेतला. काहींना भूकंप, तर काहींना सुरक्षा धोक्याबाबतचा संदेश असल्याचे वाटल्याने त्यांनी तातडीने मोबाईल तपासला.
चंद्रपूरसह संपूर्ण विदर्भात तापमानाचा पारा ४५ अंश सेल्सिअसच्या पुढे पोहोचला असताना हा अलर्ट प्रसारित करण्यात आला. त्यामुळे प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचा स्पष्ट संदेश दिल्याचे मानले जात आहे. हवामान विभागानेही पुढील काही दिवस उष्णतेचा तडाखा कायम राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.
नवतपा कालावधीला सुरुवात झाल्यानंतर विदर्भातील अनेक शहरांचा देशातील सर्वाधिक तापमान असलेल्या शहरांमध्ये समावेश झाला आहे. यामुळे उष्माघाताचा धोका वाढला असून नागरिकांनी दुपारच्या वेळेत बाहेर जाणे टाळावे, भरपूर पाणी प्यावे आणि लहान मुले तसेच ज्येष्ठ नागरिकांची विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
दरम्यान, मोबाईलवर थेट आपत्ती किंवा हवामानविषयक सूचना पाठविण्याची सेल ब्रॉडकास्ट प्रणाली विकसित देशांमध्ये नियमित वापरली जाते. भारतात मोठ्या प्रमाणावर अशा प्रकारचा अलर्ट प्रथमच अनुभवल्याने नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त होत असून, भविष्यात नैसर्गिक आपत्तींबाबत तत्काळ सूचना देण्यासाठी ही यंत्रणा प्रभावी ठरणार असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.
News - Chandrapur




Petrol Price




