फुटाळा रेतीघाटावर अवैध वाहतूक : दोन ट्रॅक्टर जप्त


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालूका प्रतिनिधी / सडक अर्जुनी : डुग्गीपार पोलीस स्टेशन हद्दीतील फुटाळा येथील रेतीघाटावरून सुरू असलेली अवैध रेती वाहतूक पोलिसांनी कारवाई करत उघडकीस आणली असून दोन ट्रॅक्टर जप्त करण्यात आले आहेत. या प्रकरणी चालक व मालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई २१ मे रोजी रात्री गस्तीदरम्यान करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, डुग्गीपार पोलीस स्टेशनचे ठाणेदार गणेश वणारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक प्रेमकुमार शेळके, नितीन देऊरकर तसेच पोलीस हवालदार महेंद्र सोनवणे, दीपक खोटेले, संजय चकोले, जागेश्वर उईके, महेंद्र चौधरी आणि बळीराम वाघाडे हे पथक गस्तीवर होते. यावेळी फुटाळा नाल्याजवळ अवैध रेती वाहतूक सुरू असल्याचे आढळून आले.
पहिल्या घटनेत ट्रॅक्टर क्रमांक MH ३५ AR ७००३ हा रात्री सुमारे दीड वाजता अवैध रेती वाहतूक करताना पकडण्यात आला. या प्रकरणात चालक श्रीकांत ठाकरे व मालक नवाज पठाण (रा. कोदामेडी) यांच्यावर कारवाई करण्यात आली.
तर दुसऱ्या घटनेत ट्रॅक्टर क्रमांक MH ३५ AJ २०६५ हा पहाटे साडेतीन वाजता अवैध रेती वाहतूक करताना पकडण्यात आला. या प्रकरणात चालक शैलेश झिंगरे (घाटबोरी) व मालक नवाज पठाण (रा. कोदामेडी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अवैध रेती तस्करीला आळा घालण्यासाठी डुग्गीपार पोलिसांनी कंबर कसली असून परिसरात गस्त वाढविण्यात आली आहे. दरम्यान, बामणी, खडकी, चिखली, कोहमारा, पिपरी, रेंगेपार, डुग्गीपार, देवपायली, मालीजुंगा, पांढरी, सौंदड, नवाटोला, वडेगाव, शेंडा, दोडके आणि केसलवाडा परिसरात मोठ्या प्रमाणात रेती तस्करी सुरू असल्याचा आरोप ग्रामस्थांनी करत अधिक कठोर कारवाईची मागणी केली आहे.
News - Gondia




Petrol Price




