महत्वाच्या बातम्या

 पोलिसांविरुद्ध खोटी साक्ष देण्यास सांगत तरुणीला शिवीगाळ : जीवे मारण्याची धमकी, महिलेविरुद्ध गुन्हा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : पोलिसांविरुद्ध खोटी साक्ष देण्यास सांगत एका तरुणीला अश्लील शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची गंभीर घटना कोर्ट परिसरात घडली. या प्रकरणी बल्लारपूर पोलिसांनी एका महिलेविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आचल नारायण गायकवाड (वय २५), रा. अष्टभुजा वार्ड, चंद्रपूर ही मजुरी करून उदरनिर्वाह करते. तिचे दर्शन अशोक तेलंग रा. बल्लारपूर याच्याशी प्रेमसंबंध आहेत. दर्शन तेलंग याला चोरीच्या गुन्ह्यात अटक झाल्यानंतर आचल गायकवाड ही पोलीस स्टेशनमध्ये चौकशीसाठी हजर होती.

४ मे २०२६ रोजी दुपारी ती न्यायालयात जबाब देण्यासाठी गेली असता, तेथे सुजल ताकसांडे याची आई भावना ताकसांडे रा. बल्लारपूर हिने तिला पोलिसांविरुद्ध खोटी तक्रार व साक्ष देण्यास प्रवृत्त केले. मात्र, आचल गायकवाड हिने नकार दिल्यानंतर भावना ताकसांडे हिने संतापाच्या भरात तिला अश्लील शिवीगाळ केली.

तसेच, माझ्या मुलाची जामीन झाली नाही तर तो बाहेर आल्यावर तुला ठार मारेल, अशी धमकी देत तिच्यावर दबाव टाकण्यात आला. यावेळी आचल गायकवाडसोबत असलेल्या तिच्या मैत्रिणीवरही दबाव आणण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे.

या प्रकरणी आचल गायकवाड हिच्या तक्रारीवरून बल्लारपूर पोलिसांनी भावना ताकसांडे हिच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) अंतर्गत कलम २९६, ३५१(३) व ३५२ अन्वये गुन्हा नोंदविला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक बिपिन इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक शब्बीर पठाण करीत आहेत.





  Print






News - Chandrapur




Related Photos