महत्वाच्या बातम्या

 पोलीस अधीक्षक कार्यालय गडचिरोली येथे महाराष्ट्र दिन समारंभ संपन्न


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६६व्या वार्षिक दिनानिमित्त, पोलीस अधीक्षक कार्यालय, गडचिरोली येथे उत्साहपूर्ण महाराष्ट्र दिन समारंभ पार पडला. पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या हस्ते सकाळी ६.४५ वाजता ध्वजारोहण करण्यात आले. यापूर्वी शहीद स्मारकास पुष्पचक्र अर्पण करून माओवाद्यांच्या हल्ल्यात शहीद झालेल्या २१४ वीर जवानांना आदरांजली वाहण्यात आली.

सन २०२५ मध्ये उल्लेखनीय कामगिरी बजावलेल्या गडचिरोली पोलीस दलातील १४५ अधिकारी व अंमलदारांना मा. पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह जाहीर करण्यात आले. त्यापैकी १५ अधिकारी व अंमलदारांना प्रातिनिधीक स्वरूपात पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या हस्ते प्रशस्तिपत्र देऊन गौरवण्यात आले.

यासोबतच महाराष्ट्र शासनाच्या वतीने सन २०२६ मध्ये प्रथमच सी-६० सेवा पदक जाहीर करण्यात आले. या नव्या पुरस्काराचे मान्यताप्राप्त अधिकारी व अंमलदारांपैकी १५ जणांना पोलीस अधीक्षक यांच्या हस्ते प्रशस्तिपत्र प्रदान करून गौरवण्यात आले.

गडचिरोली जिल्ह्यात माओवाद जवळजवळ संपुष्टात आला असून, सी-६० पथकातील जवानांनी अत्यंत गौरवपूर्ण कामगिरी बजावली आहे. सन १९९० मध्ये ६० जवानांच्या पथकाच्या स्वरूपात सी-६० पथकाची स्थापना करण्यात आली होती. आज गडचिरोली येथे १५ व प्राणहिता येथे १४ असे एकूण २९ विशेष अभियान पथके कार्यरत आहेत.

सी-६० जवानांच्या शौर्यपूर्ण कृतीमुळे आतापर्यंत ३५३ माओवाद्यांना ठार करण्यात आले, ४२४ माओवाद्यांना अटक करण्यात आली आणि ८१४ माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. या प्रयत्नांमुळे गडचिरोली जिल्हा माओवादमुक्त करण्याच्या ऐतिहासिक ध्येय साध्य करण्यात यश मिळाले असून, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ३१ मार्च २०२६ पर्यंत माओवाद संपविण्याचे उद्दिष्ट साध्य झाल्याचे घोषित केले आहे.

सी-६० सेवा पदक तीन वर्षे सेवा बजावणाऱ्या जवानांना आणि दोन वर्षे सेवा बजावणाऱ्या अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. जाहीर झालेल्या ५०० पदकांपैकी ४२५ पदक गडचिरोली जिल्ह्यातील पोलीस अधिकारी व अंमलदारांना तर उर्वरित ७५ पदक गोंदिया जिल्ह्यातील अधिकारी व अंमलदारांना प्राप्त झाली आहेत.

सकाळी ८.०० वाजता पोलीस मुख्यालय, गडचिरोली येथे मा. वित्त, नियोजन, कृषी, मदत व पुनर्वसन, विधी व न्याय, कामगार राज्यमंत्री तथा सहपालकमंत्री गडचिरोली जिल्हा अॅड. आशिष जयस्वाल यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला. यानंतर, मा. पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह व सी-६० सेवा पदक प्राप्त पाच-पाच अधिकारी व अंमलदारांचा गौरव करण्यात आला.

कार्यक्रमादरम्यान पोलीस अधीक्षक एम. रमेश यांनी गडचिरोली पोलीस दलाच्या वर्षभरातील कामगिरीचे कौतुक केले, उपस्थित शहीद कुटुंबियांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या आणि त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी अपर पोलीस अधीक्षक (अभियान) कार्तिक मधिरा, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज जी., सहाय्यक पोलीस अधीक्षक अनिकेत हिरडे, पोलीस उप-अधीक्षक अनिरुद्ध कावळे, प्रभारी पोलीस उप-अधीक्षक (गृह) स्वप्निल ईज्जपवार व इतर अधिकारी उपस्थित होते.

सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जनसंपर्क कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.





  Print






News - Gadchiroli




Related Photos