एटापल्ली तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चा दणदणीत विजय : तीन ग्रामपंचायतींमध्ये झेंडा फडकला

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / एटापल्ली : एटापल्ली तालुक्यातील गर्देवाडा, वांगेतुरी आणि मेंढरी या तीन ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट)ने दणदणीत विजय मिळवत आपली ताकद पुन्हा एकदा सिद्ध केली आहे. या निवडणुकीत मतदारांनी मोठ्या उत्साहात सहभाग नोंदवत विकासाभिमुख नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला.
या निवडणुकीत आमदार धर्मरावबाबा आत्राम यांच्या अध्यक्षतेखाली आणि युवा नेते हर्षवर्धनबाबा आत्राम व डॉ. मिताली अक्का आत्राम यांच्या नेतृत्वात पक्षाच्या उमेदवारांनी प्रभावी कामगिरी केली. प्रचारादरम्यान स्थानिक प्रश्न, मूलभूत सुविधा, पाणी, रस्ते, वीज यांसारख्या मुद्द्यांवर भर देण्यात आला होता. तसेच कार्यकर्त्यांनी गावागावात जाऊन मतदारांशी थेट संवाद साधत पक्षाची भूमिका मांडली.
ग्रामपंचायत स्तरावर झालेल्या या विजयाला स्थानिक पातळीवरील जनतेचा वाढता विश्वास आणि पक्षाच्या संघटनात्मक बळाचा मोठा आधार मिळाल्याचे चित्र दिसून आले. विरोधी पक्षांच्या उमेदवारांना कडवी झुंज देत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांनी बहुमताने विजय मिळवला.
विजयानंतर तिन्ही गावांमध्ये जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले. कार्यकर्त्यांनी फटाके फोडून,आणि मिठाई वाटून आनंद साजरा केला. आत्राम साहेबांचा विजय असो, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिंदाबाद अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी आपला उत्साह व्यक्त केला.
या यशामुळे एटापल्ली तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)ची पकड अधिक मजबूत झाली असून आगामी निवडणुकांसाठी हा विजय महत्त्वाचा मानला जात आहे. स्थानिक पातळीवर विकासकामांना गती देण्याचा निर्धार पक्ष नेतृत्वाने व्यक्त केला असून, जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध असल्याचेही सांगितले जात आहे.
एकूणच, या पोटनिवडणुकीतील विजय हा केवळ राजकीय यश नसून, जनतेने दिलेला विश्वास आणि विकासाच्या दिशेने टाकलेले पाऊल असल्याचे मानले जात आहे.
News - Gadchiroli




Petrol Price




