महत्वाच्या बातम्या

 ३ मे रोजी होणाऱ्या नीट परीक्षेसाठी मार्गदर्शक सूचना


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा : जिल्ह्यातील विविध परीक्षा केंद्रावर ३ मे रोजी दुपारी २ ते ५ या वेळेत नीट परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी बसणाऱ्या परीक्षार्थी व पालकांनी मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

परीक्षा केंद्रावर प्रवेश सकाळी ११ वाजल्यापासून सुरू होईल. दुपारी १.३० नंतर कोणत्याही उमेदवारास प्रवेश दिला जाणार नाही. त्यामुळे उमेदवारांनी वेळेआधी केंद्रावर पोहोचने आवश्यक आहे. उमेदवारांनी फोटो लावलेले प्रवेशपत्र तसेच एक वैध मूळ फोटो ओळखपत्र सोबत बाळगणे आवश्यक आहे.

प्रवेशद्वारावर काटेकोर तपासणी व बायोमेट्रिक पडताळणी करण्यात येईल. पालक किंवा संरक्षकांना परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जाणार नाही. मोबाईल फोन, इलेक्ट्रॉनिक साधने, स्मार्ट घड्याळे, अभ्यास साहित्य, कागदपत्रे, कॅल्क्युलेटर किंवा इतर अनधिकृत वस्तू बाळगण्यास मनाई आहे. तसेच, दागिने, घड्याळे, धातूच्या वस्तू परिधान करू नयेत. पट्टे (बेल्ट), टोपी किंवा नियमबाह्य अ‍ॅक्सेसरीज टाळाव्यात. बंदी असलेल्या वस्तू आढळल्यास परीक्षा नियमांनुसार कडक कारवाई केली जाईल.

परीक्षा केंद्रावर सुरक्षा, वैद्यकीय मदत, पिण्याचे पाणी व्यवस्था करण्यात आली आहे. दिव्यांग उमेदवारांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. उष्णतेच्या पार्श्वभूमीवर  उमेदवारांनी पुरेसे पाणी प्यावे व हलका आहार घ्यावा. उन्हात जास्त वेळ थांबणे टाळावे. उष्णतेमुळे होणारी गैरसोय टाळण्यासाठी वेळेआधी केंद्रावर पोहोचावे. नियमांनुसार पारदर्शक पाण्याची बाटली नेण्यास परवानगी आहे.

पालकांनी परीक्षा केंद्राबाहेर गर्दी करू नये. उमेदवार वेळेत केंद्रावर पोहोचतील याची खात्री करावी. सर्व उमेदवारांनी व पालकांनी परीक्षा सुरळीत आणि पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.





  Print






News - Wardha




Related Photos