जिल्ह्यातील १४ हजार महिला स्वयंसहायता समुहांना फिरता निधी

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा : उमेद अर्थात महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्यावतीने महिलांचे संघटन करून त्यांना रोजगारक्षम बनविण्यासोबतच उत्पन्न वाढीची विविध साधणे उपलब्ध करून दिली जातात. समुहातील महिलांना आपल्या छोट्या मोठ्या गरजा भागविण्यासाठी प्रती समुह ३० हजार याप्रमाणे फिरता निधी म्हणजे खेळते भांडवल उपलब्ध करून दिल्या जाते. गेल्यावर्षात १४ हजारावर समुहांना २१ कोटीपेक्षा अधिक खेळते भांडवल उपलब्ध करून देण्यात आले आहे.
उमेद अभियानाच्यावतीने महिलांचे मोठ्या प्रमाणावर गट तयार करण्यात आले आहे. गटाच्या माध्यमातून महिला विविध प्रकारचे छोटे मोठे व्यवसाय, उद्योग करून आर्थिकदृष्ट्या समृद्ध होत असल्याचे दिसत आहे. या गटांना प्रोत्साहन देण्यासोबतच गटातील महिलांच्या छोट्या मोठ्या गरजा भागविण्यासाठी प्रती गट ३० हजार रुपयांचा फिरता निधी गटात उपलब्ध करून दिला जातो.
हा फिरता निधी गटातील महिला कर्ज स्वरुपात घेऊन आपल्या गरजा पुर्ण करतात. कालांतराने घेतलेले कर्ज महिला गटास परत करत असल्याने महिलांना कर्ज घेऊन परतफेडीची सवय लागते. शिवाय गटाला यावर व्याज मिळत असल्याने गटाच्या उत्पन्नात देखील वाढ होते. फिरत्या निधीचे वाटप, त्याचे व्यवस्थापक, लेखा आदी बाबी महिलाच सांभाळत असल्याने आर्थिक व्यवस्थापनातून त्यांना व्यवहार व बचतीची सवय लागते.
सन २०२४-२०२५ या आर्थिक वर्षात ३१ मार्च अखेरपर्यंत जिल्ह्यातील १४ हजार ४८३ स्वयंसहायता गटातील महिलांना प्रत्येकी ३० हजार रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला. हा निधी २१ कोटी १३ लाख इतका आहे. त्यात आर्वी तालुक्यातील १८३० समुहांना २ कोटी ५८ लाख, आष्टी तालुका ११७३ समुहांना १ कोटी ७६ लाख, देवळी तालुका १६९८ समुहांना २ कोटी ५३ लाख, हिंगणगाट तालुका २०१० समुहांना २ कोटी ९६ लाख, कारंजा तालुका १२२७ समुहांना १ कोटी ७६ लाख, समुद्रपुर तालुका २०४९ समुहांना ३ कोटी ३ लाख, सेलु तालुका १६०२ समुहांना २ कोटी ३८ लाख तर वर्धा तालुक्यातील २८९४ समुहांना ४ कोटी १३ लाख रुपयांचा फिरता निधी देण्यात आला. या निधीतून समुहातील महिलांनी आपल्या आवश्यक्तेप्रमाणे रक्कम कर्ज स्वरुपात प्राप्त करून आपल्या गरजांची पुर्तता केली आहे.
समुहांना ८६ कोटीचा समुदाय गुंतवणुक निधी -
फिरत्या निधी सोबतच स्वयंसहायता गटांना समुदाय गुंतवणुक निधी देखील दिला जातो. हा निधी प्रत्येक समुह प्रत्येकी ६० हजार इतका दिला जातो. गेल्या आर्थिक वर्षात जिल्ह्यातील उमेद अभियानाच्या १४ हजार ३४७ समुहांना ८६ कोटी ८ लाख रुपयांचा समुदाय गुंतवणुक निधी देण्यात आला आहे.
News - Wardha




Petrol Price




