महत्वाच्या बातम्या

 फरस उड्डाणपुलावर भरधाव कारची दुचाकीला धडक : २१ वर्षीय तरुणाचा मृत्यू


- जेवणाचे पार्सल आणण्यासाठी जाताना अपघात; धडक देऊन कारचालक फरार

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर : जेवणाचे पार्सल आणण्यासाठी दुचाकीने जात असलेल्या २१ वर्षीय तरुणाच्या दुचाकीला भरधाव कारने जोरदार धडक दिल्याने त्याचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी पहाटे सुमारे २.४० वाजताच्या सुमारास फरस उड्डाणपुलावर घडली. अपघातानंतर कारचालक घटनास्थळावरून फरार झाला. या अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव अमनकुमार लालचंद डहारे (२१) असून तो हजारीपहाड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ राहत होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी पहाटे अमनकुमार हा त्याच्या बर्गमन दुचाकी क्रमांक एमएच ४९ बीयू ६६३८ वरून जेवणाचे पार्सल आणण्यासाठी निघाला होता. तो फरस उड्डाणपुलावरून मानकापूरकडून कोराडीच्या दिशेने जात असताना भरधाव वेगाने आलेल्या कारने त्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.

धडक बसताच अमनकुमारचा दुचाकीवरील ताबा सुटला आणि तो दुचाकीसह रस्त्यावर कोसळला. या अपघातात त्याच्या डोक्याला तसेच गुप्तांगाला गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर धडक देणाऱ्या कारचालकाने घटनास्थळी न थांबता वाहनासह पळ काढला. दरम्यान, जखमी अमनकुमारला उपचारासाठी मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्याला मृत घोषित केले. या घटनेमुळे त्याच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला.

अज्ञात कारचालकाविरुद्ध गुन्हा -
या प्रकरणी स्वप्निल सायरे यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. अपघातानंतर फरार झालेल्या कारचालकाचा शोध घेण्यासाठी पोलीस तपास करीत असून, धडक देणाऱ्या कारची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अपघाताच्या ठिकाणी उपलब्ध पुरावे तसेच इतर तांत्रिक बाबींच्या आधारे कारचालकापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जात आहे. या अपघातामुळे रात्रीच्या वेळी भरधाव वेगाने वाहन चालविणाऱ्या चालकांवर नियंत्रण ठेवण्याची तसेच रस्ते सुरक्षेबाबत अधिक दक्षता घेण्याची गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे.





  Print






Related Photos