संभाव्य एल निनोच्या पार्श्वभूमीवर राज्य सज्ज ; जलसंधारण, पाणी नियोजन आणि कृषी सुरक्षा यावर भर : मुख्यमंत्री फडणवीस

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / मुंबई : संभाव्य एल निनोच्या पार्श्वभूमीवर राज्यातील पाणी व्यवस्थापन, कृषी सुरक्षा आणि पशुधन टिकवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक झाली. बैठकीत कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, कृषि, वित्त व नियोजन राज्यमंत्री आशिष जयस्वाल तसेच कृषी, जलसंपदा, जलसंधारण, पर्यावरण, सहकार, पशुसंवर्धन, मृद व वित्त विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या अंदाजानुसार, ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यांत एल निनोचा सर्वाधिक परिणाम जाणवण्याची शक्यता आहे, आणि पावसाळा सरासरीपेक्षा कमी राहण्याचा अंदाज आहे. मे महिन्यात उष्णतेची तीव्रता तुलनेने कमी राहील, परंतु उष्णतेच्या लाटा अधिक प्रमाणात येण्याची शक्यता आहे. पॉझिटिव्ह आयओडी विकसित झाल्यास एल निनोच्या परिणामांची तीव्रता काही प्रमाणात कमी होऊ शकते.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, २०१५ मधील एल निनोच्या अनुभवावरून योग्य नियोजनाने पिकांचे नुकसान टाळता येते. पावसातील अनियमिततेमुळे विशेषतः मराठवाड्यात परिणाम होतो; दोन पावसाच्या सरींमध्ये दीर्घ खंड पडल्यास पिकांवर ताण येतो, परंतु संरक्षित सिंचनामुळे नुकसान कमी करता येते.
जलयुक्त शिवार व गाळमुक्त धरण: गाळयुक्त शिवार योजनांची कामे तातडीने पूर्ण करावीत आणि जुन्या जलस्त्रोतांची दुरुस्ती व पुनरुज्जीवन प्राधान्याने करावे. वित्त विभागाने तत्काळ निधी उपलब्ध करावा. कमी पावसातही सिंचनाची सुविधा उपलब्ध करून देणारी ही यंत्रणा प्रभावी ठरेल. जी रामजी योजना अंतर्गत कामे योग्य प्रकारे झाली आहेत की नाही, यावर लक्ष ठेवण्यासाठी स्थानिक टास्क फोर्स तयार करण्याचे निर्देश दिले.
पाणी बचतीसाठी टास्क फोर्स: प्रत्येक जिल्ह्यात स्थानिक टास्क फोर्स स्थापन करून जिल्हाधिकारी, सिंचन अधिकारी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांचे समन्वय साधावा. पाण्याचा काटेकोर वापर आणि साठवणूक सुनिश्चित केली जावी.
वैरण विकास कार्यक्रम: धरणांच्या बॅकवॉटर क्षेत्रात वैरण विकास कार्यक्रम प्रभावीपणे राबवावा, पशुधनासाठी चारा टंचाई रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात. सोलापूर, सांगली आणि मराठवाडा भागांमध्ये चारा उपलब्धता सुनिश्चित करणे आवश्यक आहे.
खत व बियाण्यांचा पुरवठा: अॅग्रीस्टॅक प्रणालीशी जोडून खत वितरणात पारदर्शकता वाढवावी. डीएपी खताचे नियोजनबद्ध वितरण करावे. बियाण्यांची कृत्रिम टंचाई टाळण्यासाठी क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी सर्व विक्री केंद्र तपासावे.
कृषिमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले: संभाव्य एल निनोच्या पार्श्वभूमीवर कृषी विभाग पूर्णपणे सज्ज असून शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी सर्व उपाय तातडीने राबवले जात आहेत. पावसाच्या अनियमिततेमुळे चाऱ्याची टंचाई निर्माण होऊ नये म्हणून महाबीज तसेच इतर चारा व बियाणे पुरवठादारांना आवश्यक साठा ठेवल्याची खबरदारी घ्यावी.
बैठकीत वित्त, नगर विकास, जलसंपदा, सहकार, पर्यावरण, पशुसंवर्धन, मृद व जलसंधारण विभाग तसेच राज्य आपत्ती व्यवस्थापन केंद्राचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
News - Rajy




Petrol Price




