जळगाव शिक्षक भरती प्रकरण : बोगस शालार्थ आयडींचा वापर, १ हजार ००४ शिक्षकांची नियुक्ती सदोष


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / जळगाव : जळगावमधील शिक्षक भरती प्रकरणात बोगस शालार्थ आयडी काढून शिक्षकांची नियुक्ती केल्याचे एसआयटीच्या तपासात उघड झाले आहे. प्रथमच एसआयटीने शिक्षकांची यादी तयार केली असून, त्यात तब्बल १ हजार ००४ शिक्षकांचा समावेश आहे. तज्ज्ञांच्या अंदाजानुसार हा आकडा तिपटीने वाढण्याची शक्यता आहे.
तत्कालीन शिक्षणाधिकारी नितीन बच्छाव आणि उपसंचालक बी. बी. चव्हाण यांच्या स्वाक्षरीतून या शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली होती; परंतु तपासात ही नियुक्ती सदोष असल्याचे स्पष्ट झाले आहे.
राज्यात गाजत असलेल्या बोगस शालार्थ आयडी प्रकरणाची सुरुवात नाशिकमधील तत्कालीन शिक्षण उपसंचालक भाऊसाहेब चव्हाण यांनी भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवून केली होती. त्यानंतरच्या वर्षभर चाललेल्या तपासात जिल्हा परिषद, महानगरपालिका, अनेक शिक्षण अधिकारी आणि शैक्षणिक संस्थाचालक यांचा समावेश रडारवर आला.
फिर्यादी अधिकारी भाऊसाहेब चव्हाण यांच्यावरही या प्रकरणात गुन्हा दाखल झाला असून, जळगाव जिल्ह्यातील तपासानंतर तब्बल १००८ शिक्षकांची यादी नाशिकच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे सुपूर्द करण्यात आली आहे.
जळगावमधील ३५ हून अधिक शैक्षणिक संस्थांचा समावेश असून, नियुक्ती करताना नितीन बच्छाव आणि बी. बी. चव्हाण यांच्या स्वाक्षरीवर प्रक्रिया केली गेली होती. काही प्रकरणांमध्ये संभाजीनगर शिक्षण उपसंचालकांकडून कागदपत्रांची पडताळणी देखील करण्यात आली होती.
तपासणी अहवालानुसार विविध शैक्षणिक संस्थांमधील नियुक्ती आदेश, शालार्थ ड्राफ्ट, कागदपत्रे आणि संबंधित नोंदींची पडताळणी केली असता अनेक ठिकाणी नोंदी अपूर्ण, कागदपत्रांमध्ये तफावत आणि आदेशांची माहिती शासकीय नोंदींशी जुळत नसल्याचे निष्पन्न झाले आहे.
News - Rajy




Petrol Price




