महत्वाच्या बातम्या

 ऊसतोड कामासाठी मजूर देण्याचे आमिष : मुकादमाला २२ लाखांचा गंडा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / बीड : मजूर आणि ऊसतोडणीसाठी वाहने पुरविण्याचे आमिष दाखवून एका ऊसतोड मुकादमाची तब्बल २२ लाख ८० हजार रुपयांची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी माजलगाव येथील एका पोट-मुकादमाविरुद्ध वडवणी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

खडकी, वडवणी, बीड, महाराष्ट्र येथील रहिवासी रामकिसन शंकर चोले हे ऊसतोड मुकादमाचा व्यवसाय करतात. सन २०२१-२०२२ च्या गळीत हंगामासाठी त्यांनी कर्नाटक राज्यातील बसवेश्वर शुगर्स या साखर कारखान्याशी मजूर व वाहने पुरविण्याचा करार केला होता. या कामाच्या मोबदल्यात कारखान्याने चोले यांच्या बँक खात्यावर २२ लाख ८० हजार रुपये जमा केले होते.

याचदरम्यान माजलगाव येथील सुधाकर भानुदास राठोड याने चोले यांची भेट घेऊन स्वतःकडे दोन टोळ्या, ३२ मजूर व दोन वाहने असल्याचे सांगत ती कारखान्याला पुरविण्याचे आश्वासन दिले. त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून चोले यांनी राठोड याच्यासोबत नोटरी केली आणि कारखान्याकडून मिळालेली संपूर्ण रक्कम आरटीजीएस व धनादेशाद्वारे त्याच्या खात्यावर वर्ग केली.

पैसे घेतले; काम मात्र केले नाही -
मात्र पैसे स्वीकारल्यानंतरही सुधाकर राठोड याने ठरल्याप्रमाणे मजूर किंवा वाहने कारखान्याला पुरविली नाहीत. चोले यांनी वारंवार विचारणा करूनही राठोडने पैसे परत देण्यास टाळाटाळ केली. एवढेच नव्हे तर पैसे मागितल्यावर त्याने चोले यांना दमदाटी करण्यास सुरुवात केली, असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच रामकिसन चोले यांनी वडवणी पोलीस स्टेशन येथे धाव घेऊन तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी सुधाकर भानुदास राठोड याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला असून प्रकरणाचा पुढील तपास पोलिस हवालदार अशोक केदार करीत आहेत. 





  Print






News - Rajy




Related Photos