अहेरीत विराट हिंदू संमेलन उत्साहात : राष्ट्रसेवेसाठी महिलांनी व पुरुषांनी पुढे येण्याचे अंजली हिरुळकर यांचे आवाहन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / अहेरी : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून अहेरी येथील वीर ब्राम्हमगारु मंदिर पटांगणात विराट हिंदू संमेलनाचे भव्य आयोजन करण्यात आले. महिलांनी केवळ घरगुती जबाबदाऱ्यांपुरते मर्यादित न राहता राष्ट्र उभारणीत सक्रिय सहभाग घ्यावा, असे प्रेरणादायी आवाहन प्रमुख वक्त्या अंजली हिरुळकर यांनी यावेळी केले.
राणी दर्याबाई वस्तीच्या वतीने आयोजित या संमेलनात अहेरी नगरातील विविध वॉर्डांमधून हजारो महिला व पुरुषांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
पंचपरिवर्तनाचा मंत्र -
राष्ट्र सेविका समितीच्या सहकार्यवाहिका व चंद्रपूर येथील मुख्य वक्त्या अंजलीताई हिरुळकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना पंचपरिवर्तन ही संकल्पना मांडली. समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी प्रत्येक नागरिकाने दैनंदिन जीवनात पाच तत्त्वांचा अवलंब करावा, असे त्यांनी सांगितले.
त्यामध्ये सामाजिक समरसता निर्माण करणे, कुटुंबात संस्कारांची जोपासना करणे, पर्यावरणाचे रक्षण करणे, स्वावलंबी जीवनशैली स्वीकारणे आणि नागरी कर्तव्यांचे प्रामाणिकपणे पालन करणे या बाबींचा समावेश आहे.
आजची महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रात कार्यरत आहे. महिलांनी चूल आणि मूल या मर्यादेतून बाहेर पडून राष्ट्रसेवेसाठी आपला अमूल्य वेळ द्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाची वैशिष्ट्ये -
कार्यक्रमाची सुरुवात भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलनाने झाली. सांस्कृतिक कार्यक्रमात गुरु भालचंद्र ठाकरे यांच्या प्रशिक्षणार्थींनी सादर केलेल्या भरतनाट्यम् नृत्याने उपस्थितांची मने जिंकली.
महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमादरम्यान विचारलेल्या प्रश्नमंजुषेत अचूक उत्तरे देणाऱ्या महिला व पुरुषांना बक्षिसे देऊन प्रोत्साहित करण्यात आले. तसेच वेळेत उपस्थित राहिलेल्या पाच भाग्यवान महिलांना आकर्षक भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले.
मान्यवरांची उपस्थिती -
या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून संत राजेंद्रजी दोन्तुल महाराज, कार्यक्रमाचे संयोजक विलास कंदोटीवार तसेच स्थानिक वस्तीतील प्रमुख नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुबक संचालन पूर्वा दोन्तुलवार यांनी केले. प्रास्ताविक भाविका मेहता, प्रश्नमंजुषा कांचन देशपांडे यांनी घेतली, तर वैशाली देशपांडे यांनी आभार मानले.
कार्यक्रमाची सांगता भारत मातेच्या आरतीने करण्यात आली. त्यानंतर सर्व उपस्थितांसाठी भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. या संमेलनामुळे संपूर्ण अहेरी परिसरात भक्तीमय आणि राष्ट्रप्रेमाचे वातावरण निर्माण झाले होते.
News - Gadchiroli




Petrol Price




