जिल्हास्तरीय अटल टिंकरिंग - २०२६ प्रदर्शनीमध्ये गोंडवाना सैनिकी विद्यालयाचा प्रथम क्रमांक


विदर्भ न्युज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : चंद्रपूर येथे शालेय शिक्षण व क्रीडा विभाग तसेच राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय अटल टिंकरिंग - २०२६ प्रदर्शनी मध्ये गोंडवाना सैनिकी विद्यालयाने उल्लेखनीय यश संपादन करत प्रथम क्रमांक पटकावला आहे.
Empowering Teachers to Become ATL Transformation Agents या शीर्षकाखाली पार पडलेल्या या प्रदर्शनात जिल्हाभरातील अनेक नामांकित शाळांनी सहभाग नोंदविला होता. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, नवोन्मेषी विचारसरणी आणि तंत्रज्ञानाधारित प्रयोगशीलता विकसित करण्याच्या उद्देशाने या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेत Theme Based गटातून गोंडवाना सैनिकी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. कॅडेट मास्टर आदित्य तिरुपती गादे आणि कॅडेट मास्टर अंश नितीन धोडरे यांनी Smart Dustbin and School Hygiene Credit System ही नाविन्यपूर्ण वैज्ञानिक प्रतिकृती सादर केली. शाळेतील स्वच्छता व्यवस्थापन अधिक परिणामकारक आणि विद्यार्थ्यांना स्वच्छतेबाबत प्रोत्साहन देणारी ही संकल्पना परीक्षकांना अत्यंत भावली.
सादर केलेल्या वैज्ञानिक प्रतिकृतीस प्रथम क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. विजेत्या विद्यार्थ्यांचा ट्रॉफी, प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. या उल्लेखनीय यशामुळे विद्यालयाचा सन्मान उंचावला असून ही विद्यालयासाठी अत्यंत अभिमानाची व आनंदाची बाब असल्याचे मत प्राचार्य ओमप्रकाश संग्रामे यांनी व्यक्त केले. त्यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
या यशामागे विद्यार्थ्यांची जिद्द, सातत्यपूर्ण मेहनत, नवोन्मेषी विचारसरणी आणि वैज्ञानिक दृष्टिकोन हे मुख्य घटक असल्याचे मार्गदर्शक शिक्षक देवेंद्र म्हशाखेत्री यांनी सांगितले. विद्यार्थ्यांना योग्य दिशा दाखवण्याची संधी मला मिळाली, हे माझे भाग्य समजतो, असे ते म्हणाले.
या प्रकल्पासाठी शिक्षक रुपेश बारसागडे, प्रा. विजय गोंडाणे व रमण गागापुरावार यांचे विशेष सहकार्य व मार्गदर्शन लाभले. विद्यालयाचे पर्यवेक्षक अजय वानखेडे, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनीही विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील यशासाठी शुभेच्छा दिल्या.
गोंडवाना सैनिकी विद्यालयाच्या या यशामुळे जिल्ह्यातील शैक्षणिक क्षेत्रात विद्यालयाची वेगळी ओळख निर्माण झाली असून विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रात विद्यार्थी उल्लेखनीय कामगिरी करू शकतात, याची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे.
News - Gadchiroli




Petrol Price




