होळीच्या जल्लोषात दुःखद दुहेरी दुर्घटना : वैनगंगा नदीत दोन युवकांचा बुडून मृत्यू


- धुलीवंदनाच्या दिवशी वेगवेगळ्या घटनांत जीवितहानी
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : रंगोत्सवाच्या आनंदावर दुःखाची सावली पसरवणाऱ्या दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये मंगळवारी धुलीवंदनाच्या दिवशी वैनगंगा नदी पात्रात बुडून दोन युवकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. आरमोरी तालुक्यात घडलेल्या या घटनांमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून सणाचा उत्साह क्षणात शोकात परिवर्तित झाला.
पहिली घटना सकाळी सुमारे १० वाजताच्या सुमारास आरमोरी येथील गायकवाड चौक परिसरातील २५ वर्षीय शुभम नामदेव रामटेके याच्याबाबत घडली. होळी साजरी केल्यानंतर तो मित्रांसह गांगलवाडी टी-पॉईंटजवळील नदीकाठी आंघोळीसाठी गेला होता. रंग खेळल्यानंतर सर्वजण नदीत उतरले असता पाण्याचा अंदाज न आल्याने शुभम खोल पाण्यात गेला आणि प्रवाहात बुडाला. मित्रांनी आरडाओरड करून मदत मागितली. स्थानिकांच्या मदतीने त्याला बाहेर काढण्यात आले; मात्र वैद्यकीय तपासणीत डॉक्टरांनी मृत घोषित केले.
शुभम हा कुटुंबातील एकुलता एक मुलगा होता. वडील कबाड व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी मुलाला अभियांत्रिकी शिक्षण दिले होते. दोन महिन्यांपूर्वीच त्याला खासगी कंपनीत नोकरी मिळाली होती. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती सुधारण्याचे स्वप्न पाहणाऱ्या या तरुणाच्या अकाली निधनाने शहरात शोककळा पसरली आहे.
दुसरी घटना दुपारी सुमारे १२.१५ वाजताच्या सुमारास वसा येथील नदीपात्रात घडली. मुन्ना राजेंद्र भोयर (वय ३२, रा. मोहझरी, ता. जि. गडचिरोली) हा मजुरी करून उदरनिर्वाह करीत होता. धुलीवंदनानिमित्त मित्रांसह रंग खेळल्यानंतर तोही आंघोळीसाठी नदीत उतरला. पाण्याची खोली लक्षात न आल्याने तो अचानक खोल भागात गेला व बुडाला. मित्रांनी मदतीचा प्रयत्न केला; मात्र तोपर्यंत उशीर झाला होता.
घटनेची माहिती मिळताच आरमोरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला व मृतदेह ताब्यात घेतला. दोन्ही प्रकरणी मर्ग दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
News - Gadchiroli




Petrol Price




