महत्वाच्या बातम्या

 बिबट्याच्या हल्ल्यात वृद्धाचा दुर्दैवी मृत्यू : धानोरा तालुक्यात भीतीचे सावट


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : तालुक्यातील मुरूमगाव येथून पायदळ आपल्या गावी परतत असताना ६३ वर्षीय वृद्धाचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बुधूसिंग नहरू उसेंडी (रा. केहकावाही) असे मृतकाचे नाव असून या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बुधूसिंग उसेंडी हे २४ फेब्रुवारी रोजी मुरूमगाव येथे भरलेल्या साप्ताहिक मंडईसाठी गेले होते. मंडई आटोपल्यानंतर सायंकाळच्या सुमारास ते एकटेच सुमारे सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या आपल्या केहकावाही गावाकडे पायी निघाले होते. उमरपाल गावाजवळील जंगल परिसरातील कंपार्टमेंट क्रमांक ६७७ मध्ये दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर अचानक झडप घातली. बिबट्याने त्यांना फरपटत जंगलाच्या दिशेने नेले आणि या हल्ल्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.

रात्री न परतल्याने शोधमोहीम -
बुधूसिंग उसेंडी रात्री उशिरापर्यंत घरी न परतल्याने कुटुंबीयांना संशय आला. त्यांनी गावकऱ्यांच्या मदतीने शोध सुरू केला. २५ फेब्रुवारी रोजी सकाळी काही ग्रामस्थांना रस्त्याच्या कडेला त्यांचे चप्पल व इतर सामान पडलेले आढळले. तसेच बिबट्याने फरपटत नेल्याच्या खुणा दिसल्याने अनर्थ घडल्याची खात्री पटली. यानंतर तात्काळ वनविभागाला माहिती देण्यात आली.

वन विभागाची शोधमोहीम -
माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जंगल परिसरात शोधमोहीम राबवून काही अंतरावर बुधूसिंग उसेंडी यांचा मृतदेह शोधून काढला. पंचनामा करून मृतदेह पुढील वैद्यकीय तपासणीसाठी पाठविण्यात आला.

ग्रामस्थांची बंदोबस्ताची मागणी -
या घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र भीती निर्माण झाली आहे. जंगलालगतच्या गावांमध्ये बिबट्याचा वाढता वावर चिंतेचा विषय ठरत आहे. संबंधित बिबट्याचा तात्काळ बंदोबस्त करावा, तसेच वनविभागाने गस्त वाढवून नागरिकांच्या सुरक्षेची हमी द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

वन्यप्राण्यांच्या वाढत्या हैदोसावर प्रभावी कारवाई होत नसल्याची नाराजी नागरिकांमध्ये व्यक्त होत असून, भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची गरज अधोरेखित होत आहे.





  Print






News - Gadchiroli




Related Photos