गडचिरोलीत राज्यस्तरीय वधू-वर व पालक परिचय मेळावा उत्साहात संपन्न


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : द्वारकाप्रसाद सातपुते बहुउद्देशीय संस्था, आरमोरी व संताजी स्मृती प्रतिष्ठान, गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने २२ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी १२ वाजता राज्यस्तरीय वधू-वर व पालक परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. तेली समाजातील युवक-युवतींना योग्य जोडीदार शोधण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा मेळावा पार पडला.
कार्यक्रमाच्या उद्घाटिका म्हणून योगिता प्रमोदजी पिपरे (माजी नगराध्यक्ष तथा नगरसेविका, नगरपरिषद गडचिरोली) उपस्थित होत्या. आपल्या मार्गदर्शनात त्या म्हणाल्या की, अशा परिचय मेळाव्यांमुळे समाजातील सुशिक्षित व उच्चशिक्षित युवक-युवतींना एकत्र येण्याची संधी मिळते आणि योग्य जोडीदार जुळविण्यासाठी प्रभावी व्यासपीठ निर्माण होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभाकरजी वासेकर, अध्यक्ष, संताजी स्मृती प्रतिष्ठान, गडचिरोली होते. प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक म्हणून प्रमोदराव पिपरे (जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र प्रांतिक तैलीक महासंघ तथा संचालक, महाराष्ट्र राज्य सहकार संघ मर्यादित, पुणे) यांनी अशा मेळाव्यांमुळे वेळ आणि पैशाची बचत होत असून समाजातील नाती अधिक दृढ होण्यास मदत होत असल्याचे मत व्यक्त केले.
यावेळी देवाजी सोनटक्के (एम.डी. चलाख), शिला सोमनकर, भैयाजी सोमनकर, विलास अडकीने यांच्यासह तेली समाजातील अनेक बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच नगरपरिषद गडचिरोलीचे पदाधिकारी, अधिवक्ता, सामाजिक कार्यकर्ते, विविध तेली समाज संघटनांचे प्रतिनिधी, सेवानिवृत्त कर्मचारी, शिक्षक, व्यापारी व प्रतिष्ठित नागरिकांची उपस्थिती लक्षणीय होती.
या मेळाव्यात चंद्रपूर, नागपूर, भंडारा, गोंदिया व गडचिरोली जिल्ह्यातील सुमारे १०० वधू-वरांनी सहभाग नोंदविला. पालकांसह एकूण सुमारे ३०० जण उपस्थित होते. वधू-वरांनी स्वतःचा परिचय देत परस्पर संवाद साधला.
कार्यक्रमाचे आयोजन द्वारकाप्रसाद सातपुते बहुउद्देशीय संस्था व समाज सदस्यांच्या सहकार्याने तसेच Wadhuwar Parichay OPC Pvt. Ltd. चे अध्यक्ष द्वारकाप्रसाद सातपुते व कार्यकारी मंडळ यांच्या माध्यमातून करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन पितांबर कुकडकर सर यांनी केले, तर आभार प्रदर्शन गोपीचंद बोदलकर यांनी केले.
समाजातील युवक-युवतींना योग्य संधी उपलब्ध करून देण्यासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.
News - Gadchiroli




Petrol Price




