महत्वाच्या बातम्या

 गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने नवनिर्मित पोमकें फुलणार (कॅम्प गुंडूरवाही) येथे आरोग्य शिबिराचे करण्यात आले आयोजन


- अतिदुर्गम कोपर्शी, फुलणार, गुंडूरवाही, पोयरकोठी व आसपासच्या अतिदुर्गम गावांतील एकूण २१० नागरिक व विद्याथ्र्यांंची तज्ञ वैद्यकीय पथकाकडून तपासणी  

- पोलीस रुग्णालय गडचिरोली, जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली, जिल्हा परिषद गडचिरोली  व सीआरपीएफ यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आला उपक्रम

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : गडचिरोली पोलीस दलाकडून जिल्ह्रातील नागरिकांसाठी वेळोवेळी विविध कल्याणकारी उपक्रम राबविले जात असतात. जिल्ह्रामधील अतिदुर्गम भागातील नागरिकांपर्यंत देखील आरोग्य सेवा पोहचविण्याच्या उद्देशाने गडचिरोली पोलीस दलाकडून विविध आरोग्य मेळावे आयोजित केले जात असतात.

याच उपक्रमांचा एक भाग म्हणून गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने नवनिर्मित पोमके फुलणार (कॅम्प गुंडूरवाही) येथे पोलीस रुग्णालय गडचिरोली, जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली, जिल्हा परिषद गडचिरोली व सीआरपीएफ यांच्या विद्यमाने आज २१ फेब्राुवारी २०२६ रोजी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

अतिदुर्गम भागातील नागरिकांमध्ये आरोग्य सुविधांविषयी जनजागृती करुन नागरिकांना विविध आरोग्य तपासणी आणि औषधोपचार मिळवून देण्याच्या उद्देशाने पोलीस अधीक्षक गडचिरोली नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली सदर आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये पोलीस रुग्णालय गडचिरोलीचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनिल मडावी, जिल्हा सामान्य रुग्नालयाचे डॉ. विरेंद्र भावे (फिजीशीयन), डॉ. शारदा ठाकरे (स्त्रिरोगतज्ञ), डॉ. देवश्री होळी (नेत्ररोगतज्ञ), डॉ. समिर बनसोडे (बालरोगतज्ञ), राकेश चांदेकर, शिल्पा चांदेकर यांचे नेतृत्वात नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली.

सदर मेळाव्यादरम्यान हद्दीतील सुमारे २१० नागरिकांची विविध आजारांबाबत तपासणी करून आवश्यकतेनूसार नागरिकांना मोफत औषधे उपलब्ध करुन देण्यात आली आहेत, तसेच विविध आजारांविषयी व पोषण समस्यांविषयी मार्गदर्शन करण्यात आले. तसेच मेळाव्या प्रसंगी ज्येष्ठ नागरिकांची नेत्रतज्ञाव्दारे तपासणी करण्यात येवून आवश्यक औषधे उपलब्ध करून देण्यात आली आहे.

यावेळी एकूण २८ नागरिकांना आवश्यकतेनूसार विविध रुग्णालयांच्या ठिकाणी पुढील तपासणीसाठी शिफारस केलेली आहे. तसेच बालरोग तज्ञांकडून शालेय विद्याथ्र्यांची तपासणी आणि स्त्रीरोग तज्ञांकडून महिलांची तपासणी करण्यात येऊन आवश्यक मार्गदर्शन करण्यात आले आहे.

गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने सन २०२१ पासून आजपावेतो एकूण १७९ आरोग्य मेळाव्यांच्या माध्यमातून एकूण ४०,२६५ नागरिकांची आरोग्य तपासणी केलेली आहे. तसेच एकूण ०५ रक्तदान शिबिरांच्या माध्यमातून एकूण ४ हजार ३६१ युनिट रक्ताचे संकलन करण्यात आले आहे. यासोबतच ऑपरेशन रोशनीच्या माध्यमातून एकूण ९ हजार ९७१ पेक्षा अधिक नागरिकांची नेत्र तपासणी करुन एकूण १ हजार ४१२ नागरिकांची मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आलेली आहे.

सदर शिबिराचे आयोजन पोलीस अधीक्षक गडचिरोली नीलोत्पल, मुख्य कार्यकारी अधिकारी जि. प. गडचिरोली सुहास गाडे, कमांडन्ट सीआरपीएफ ३७ बटा. दाओ इंजिरकन किंन्डो, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक अहेरी कार्तिक मधीरा, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज जी., पोलीस उप-अधीक्षक (अभियान) विशाल नागरगोजे तसेच प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी भामरागड अजय कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली नवनिर्मित पोमके फुलणार (कॅम्प गुंडूरवाही) चे प्रभारी अधिकारी सपोनि. युवराज घोडके यांच्या नेतृत्वात पोउपनि सतिश पवार, आकाश जाधव, रापोउपनि प्रशांत पाटील, आर. दाबेराव व अंमलदार यांनी यशस्वीरित्या पार पाडले.





  Print






News - Gadchiroli




Related Photos