महत्वाच्या बातम्या

 जिल्हा परिषद शिष्यवृत्ती परीक्षा २२ फेब्रुवारीला


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / वर्धा  : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या वतीने जिल्हा परिषद वर्धा अंतर्गत इयत्ता पाचवी व इयत्ता आठवी शिष्यवृत्ती परीक्षा रविवार, २२ फेब्रुवारी रोजी जिल्ह्यातील विविध परीक्षा केंद्रांवर आयोजित करण्यात येणार आहे.

इयत्ता पाचवीसाठी जिल्ह्यातील ४८ परीक्षा केंद्रांवर ७८० शाळांमधील एकूण ६ हजार ७६३ विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत. तर इयत्ता आठवीसाठी २८ परीक्षा केंद्रांवर ३३५ शाळांमधील ३ हजार ६१३ विद्यार्थी परीक्षा देणार असून एकूण १० हजार ३७६ विद्यार्थी या शिष्यवृत्ती परीक्षेत सहभागी होणार आहेत.

परीक्षेचा पहिला पेपर (भाषा व गणित) सकाळी ११ ते दुपारी १२.३० या वेळेत होणार असून दुसरा पेपर दुपारी  २ ते २.३० या वेळेत आयोजित करण्यात आला आहे. पेपर सुरू झाल्यानंतर पहिल्या अर्ध्या तासापर्यंतच विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाईल.

परीक्षा प्रक्रिया पारदर्शक, सुरक्षित व शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी सर्व केंद्रप्रमुखांना सविस्तर मार्गदर्शन पुस्तिका देण्यात आली आहे. गोपनीय साहित्य हाताळणी, आसन व्यवस्था, पर्यवेक्षक नियोजन व परीक्षा शिस्त याबाबत आवश्यक ते नियोजन करण्यात आले आहे. उपशिक्षणाधिकारी ज्ञानेश्वर पानसरे व विस्तार अधिकारी देवानंद एकापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व यंत्रणा सज्ज असून परीक्षा यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी आवश्यक तयारी पूर्ण करण्यात आली आहे.

पालक व शिक्षकांनी विद्यार्थ्यांना वेळेत परीक्षा केंद्रावर पोहोचवावे. विद्यार्थ्यांना रोल नंबरनुसार परीक्षा गृहात बसविल्यानंतर पालकांनी केंद्राबाहेर प्रतीक्षा करावी तसेच परीक्षा केंद्र परिसरात शांतता राखावी, असे आवाहन प्राथमिक शिक्षणाधिकारी रुपेश कांबळे यांनी केले.





  Print






News - Wardha




Related Photos